‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेले गायक-गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. आपल्या सुमधूर आवाजाने प्रथमेश-मुग्धा यांनी आपल्या रसिक श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सध्या मुग्धा व प्रथमेश ऑस्ट्रेलियामध्ये संगीत दौरा करत आहेत आणि या दौऱ्याचे खास फोटो ते शेअर करत आहेत. (Mugdha Vaishampayan and Prathesh Laghate in Australia)
मुग्धा व प्रथमेशने ऑस्ट्रेलियामधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुग्धा व प्रथमेशने ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित असे सिडनी येथील ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज येथे फोटोशूट केले आहे. यावेळी त्यांनी मराठमोळा असा लूक केला होता. प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता सेट आणि काळ्या रंगाचे प्रिंटेड जॅकेट परिधान केले होते तर मुग्धाने गडद लाल रंगाची प्रिंटेड साडी नेसल्याचे पाहायला मिळाले. अशातच मुग्धा-प्रथमेश यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मराठमोळ्या जेवणावरही ताव मारला. याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जेवणाचे खास फोटो शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियात प्रथमेश व मुग्धा यांनी मुंबईच्या लोकप्रिय समोसा व वडापाववर ताव मारला. याशिवाय त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडीही खाल्ली. याचा फोटो शेअर करत त्याने “कार्तिकी एकादशीच्या उपवसाच्या दिवशी मेलबर्नमध्ये अस्सल चवीची साबुदाणा खिचडी मिळाली. यावेळी त्यांनी साबुदाणा वडाही खाल्ला. तसंच अस्सल कोकम सरबतदेखील घेतलं.
आणखी वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? पाच वर्षांनी सांगितले नेमकं कारण, म्हणाले, “राजकीय…”
याबरोबरच प्रथमेश भारतात अनंताचे फूल असतं त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियातही अनंताचे फूल दिसल्याचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय भारतातील औषधी वनस्पती दुर्वाचदेखील खास फोटो शेअर केला आहे. दरम्यान, प्रथमेश व मुग्धा हा लाईव्ह शो करण्यासाठी परदेशात रवाना झाले आहेत. ‘मर्म बंधातील ठेव’चा लाईव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी दोघे ऑस्ट्रेलिया गेले आहेत, त्यांचा या शोचा ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड दौरा सुरु आहे.