हिंदी मालिकांमधील ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर मालिकाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेमध्ये यशपालची भूमिका करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५९व्या वर्षी लोखंडवाला येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूड तसेच मालिकांमधील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Rupali Ganguly post on Rituraj singh)
सुप्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये ऋतुराज यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. या मालिकेमध्ये त्यांनी अनुपमाच्या बॉसची भूमिका केली होती. मालिकेची नायिका रुपाली गांगुलीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. रुपालीने या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “प्रिय सर, तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला तुमच्याकडून एक विद्यार्थी म्हणून अभिनय आणि आयुष्यातील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी खूप खुश होते. एकदा तुम्ही म्हणाला होतात की, तुम्ही माझे काम पाहिले आहे आणि तरीही मला हे सिद्ध करायचं होतं की ज्या दिग्गज कलाकारांना मी काम करताना पाहिले त्यांच्याबरोबर मला काम करायचे आहे”.
पुढे रुपाली म्हणाली की, “मालिकेच्या सेटवर तुमचे हास्य हेच माझ्यासाठी चांगल्या कामाची पोचपावती होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. पण मी तुमच्याबरोबर राहून अनेक गोष्टी शिकू शकले. तुमचा हा फोटो मी तेव्हा काढला होता जेव्हा तुम्ही शेफची टोपी घातली होती. मी तेव्हा हा फोटो तुम्हाला पाठवू शकले नाही. पण इतक्या वाईट प्रसंगामध्ये तुमचा हा फोटो समोर येईल असं मुळीच वाटलं नव्हतं. तुमचं आयुष्य, विनोदशैली, चित्रपटांबद्दलचे ज्ञान हे नेहमीच लक्षात राहील. ‘अनुपमा’मध्ये यशपालची भूमिका केल्याबद्दल तुमचे आभार. त्या सर्व शब्दांसाठी धन्यवाद ज्यामुळे मी आयुष्यात पुढे जाऊ शकले. तुमच्या आत्म्यास शांती मिळो. ओम शांती ओम”.
रुपालीबरोबरच अभिनेत्री दीपिका सिंहही म्हणाली की, ”मी त्यांना चांगले ओळखते. मी त्यांना केवळ एकदाच भेटले आहे. एका भेटीमध्येच ते एकदम खरे वाटले. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. पण आता हे कधीही शक्य होणार नाही”. ऋतुराज यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.