गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. गेले अनेक दिवस या विषयावर राज्यभरात खूपच चर्चा सुरु होती. पण अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये सध्या आनंदाच व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पेढे वाटप व गुलाल उधळला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या विजयी निर्णयावर सामान्य व्यक्तीसह कलाकारांकडूनदेखील आनंद व्यक्त केला जात आहे.
नुकतीच ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे या अभिनेत्रीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक खास पोस्ट शेअर करत त्यांना पाठींबा दर्शवला होता. याच मालिकेतील येसुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेदेखील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती आणि आता मराठा आरक्षणाच्या विजयावरदेखील तिने आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ताने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमार्फत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम ‘या’ कलाकाराची नवीन मालिकेत वर्णी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावर भाषण देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच.” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘मराठा’, ‘९६कुळी मराठा’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जरांगे पाटील’, ‘मराठा आरक्षण’, ‘मराठा साम्राज्य’, ‘अभिमान’, ‘नाद’, ‘स्वराज्य’ असे अनेक हॅशटॅग देत आपल्या विजयाबद्दलच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. इतिहास उलटून पाहाल तर विजय नेहमी आमच्यासोबत होता आहे राहिल, एक मराठा लाख मराठा, मराठा खड़ा तो सरकार से बड़ा, आज आपला लढा यशस्वी झाला” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्यांचा अरक्षणाच्या विजयाचा अभिनेत्रीबरोबर आनंद साजरा केला आहे.