आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. या आई आणि बाबांवर भाष्य करणारी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेचे नाव म्हणजेच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहे’. (nivedita saraf on son aniket saraf)
या मालिकेतून अभिनेत्री निवेदिता सराफ व अशोक कदम ही कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मालिकेतून आईबाबा आणि मुलं यांच्या नात्यावर भाष्य करण्यात येणार असल्याचे प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. निवेदिता यांचा मुलगाही सध्या कामानिमित्त परदेशात आहे. तर अनिकेतला भारतातील आई-बाबा म्हणजेच निवेदिता व अशोक सराफ यांची आठवण येते का? आणि निवेदिता व अशोक सराफ यांनाही त्यांची आठवण येते का? यावर भाष्य केलं आहे.
मालिकेनिमित्त निवेदिता यांनी इट्स मज्जाशी संवाद साधला. यावेळी निवेदिता यांनी असं म्हटलं की, “अनिकेतची नोकरी परदेशात आहे, त्यामुळे त्याला कितीही वाटलं तरी तो पटकन उठून येऊ शकत नाही. त्याचा नवा नवा जॉब आहे आणि तो त्याच्या जॉबमध्ये सेटल होतो आहे. त्याचं जग आता आमच्या पेक्षा मोठं झालं आहे. त्याला जे करायचं आहे आणि त्याचा ज्यात आनंद आहे, त्यातच आमचाही आनंद आहे. पण जग आता इतकं जवळ आलं आहे की, आम्ही त्याच्याबरोबर रोज संपर्क करत असतो”.
यापुढे निवेदिता असं म्हणाल्या की, “अनिकेत आमच्यापेक्षा लांब आहे, त्याला नेहमीच इथे येता येत नाही. त्यामुळे त्याचंच प्रतिबिंब कुठे तरी उमटलं आहे”. दरम्यान, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव असे लोकप्रिय कलाकार या झळकणार आहेत. येत्या २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे.