बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या अनेक ठिकाणांवर अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच छापे टाकले होते. यानंतर आता अंमलबजावणी संचनालयाने राज कुंद्राला हाय-प्रोफाइल पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचनालयाने उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसंच प्रकरणातील इतरांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Raj Kundra summoned by the ED)
पॉर्नोग्राफी आणि ॲडल्ट फिल्म्सच्या वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शनिवारी राज कुंद्रा यांना समन्स बजावले. यापूर्वी ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये जवळपास १५ ठिकाणी छापे टाकले होते. यात राज कुंद्राचाही सहभाग होता. २०२१ मध्ये अनेक महिलांनी आरोप केले होते की, त्यांना वेब सिरीज आणि चित्रपटांच्या ऑडिशनच्या नावाखाली अश्लील कंटेंटच्या चित्रिकरणास भाग पाडले गेले. यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या विरोधात तपास सुरू केला होता.
राज कुंद्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा हा दुसरा खटला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ईडीने क्रिप्टो करन्सी प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, परंतु ईडीच्या या संलग्नक आदेशाविरोधात या जोडप्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच टाकलेल्या छाप्यानंतर राज कुंद्रा यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, “या प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत आहे”.
ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर एक वक्तव्य जारी केले होते. पत्नी शिल्पा शेट्टीला या प्रकरणात ओढू नका, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले होते. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं की, “’जोपर्यंत पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंगच्या दाव्यांचा संबंध आहे, आम्ही एवढेच सांगू इच्छितो की कितीही सनसनाटी सत्य लपवू शकणार नाही, शेवटी न्यायाचा विजय होईल! प्रसारमाध्यमांना विनंती आहे की, माझ्या पत्नीचे नाव ज्या प्रकरणांशी तिचा काहीही संबंध नाही अशा गोष्टींमध्ये वारंवार ओढू नका. मर्यादा पाळा”.