मालिका, नाटक, चित्रपट या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. प्रत्येक क्षेत्रात विविध प्रयोग करत राधिका सिनेसृष्टीत कार्यरत राहिले. मनोरंजन क्षेत्रात राधिकाला लोकप्रियता मिळाली ती देविका या भूमिकेमुळे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिका अरुंधतीच्या खास मैत्रीणीची म्हणजे ‘देविका’ची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. (Radhika Deshpande Post)
राधिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती आपले अनुभव, फोटो शेअर करत असते. बरेचदा अभिनेत्री अनेक घडामोडींवर पोस्टमधून व्यक्त होताना दिसते. यामुळे बरेचदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना ही करावा लागला आहे. अशातच अभिनेत्रीने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला एक महिना पूर्ण होताच केलेली भावुक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. राधिकाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या आजी-आजोबांबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोसह कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “आजी-आजोबा कार सेवकांसाठी, अयोध्येतल्या राम लल्लाला टेंटमध्ये रहावं लागतं आहे म्हणून रडले होते. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं ते राम मंदिराचं. आज आजी-आजोबा नाहीत पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. २२ जानेवारीचा तो क्षण. मी ढसाढसा रडले. जणू माझ्या पूर्वजांचे अश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते. झालं गेलं विसरून जा असं सांगण्याची पद्धत आहे आपल्याकडे पण पितृऋण विसरायचं नसतं. आपण सगळेच रामाच्या ऋणात आहोत. आमचं भाग्य आहे की, आम्हाला प्राणप्रतिष्ठा पाहता आली. काल एक महिना झाला. स्वप्नं मनापासून पाहिली की ती पूर्ण होतात. रामनाम मुखी अखंड राहो”.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली होती. हा दिवस राधिका देशपांडे हिने वेगळ्याच भक्तिभावाने साजरा केला. याबाबतची एक खास पोस्ट अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली होती. बाजारपेठेतील एका भाजी विक्रेत्याला मदत करतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला होता.