सिनेसृष्टीत कलाकार मंडळी काम करत असताना त्यांच्या कामांमध्ये बरेच चढउतार येत असतात. बरेचदा कलाकार मंडळींजवळ काम असतं वा कित्येकदा ते कामाच्या शोधात असतात. अथवा बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येतात. अशातच सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरून अभिनेत्री मीरा जोशी हिने प्रेमाची कबुली देत साऱ्यांना खुशखबर दिली. इतकंच नव्हे तर त्यानंतर लगेचच काही दिवसांनी तिने एक तारीखही जाहीर केली. पण हे सगळं खोटं ठरलं कारण हा एका गाण्याच्या प्रमोशनचा भाग होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मीराने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आता मीरा ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. (Meera Joshi New Serial)
अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूजही शेअर केली होती. त्यानंतर आता मीराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. या व्हिडीओत मीरा ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर अभिनेते शरद पोंक्षे देखील पाहायला मिळत आहे. याचा अर्थ मीरा आता ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत मीराने लिहीलं आहे की, झी मराठी वाहिनीवर तब्बल पाच वर्षांनंतर…, “मी ‘चंपा’ येतेय तुमचं मनोरंजन करायला उद्यापासून. रोज रात्री ८.३० वाजता. मालिका ‘दार उघड बये’मध्ये… अर्थात आपल्या लाडक्या ‘झी मराठी’ वाहिनीवर.”
मीराची ही पोस्ट पाहून तिच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मीराने आजवर ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये झळकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाच वर्षांनी मीरा ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘दार उघड बये’ या मालिकेत झळकणार आहे.