झी मराठीवरच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर… या मालिकेनंतर बऱ्या मोठ्या ब्रेकनंतर अक्षया आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीवर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षया पुन्हा एकदा झळकणार आहे. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेतते तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेगळी कथा असणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Akshaya Deodhar on her mother-in-law)
राणादा आणि अंजली या भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेनंतर दोघेही काही मालिका व कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. येत्या २३ तारखेपासून अक्षयाची ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावर अक्षयाच्या सासू, आई व हार्दिकची काय प्रतिक्रिया होती? यावर अक्षयाने भाष्य केलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री अक्षया देवधरने ‘मज्जा पिंक’शी खास संवाद साधला.
यावेळी अक्षयाला “तू नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेस यावर सासू व आईची काय प्रतिक्रिया होती?” असं विचारण्यात आलं. यावर अक्षयाने असं म्हटलं की, “आई, सासूबाई आणि घरातील सगळेच खुश झाले. प्रोमो बघूनच ते उत्सुक झाले होते. आता पुन्हा एकदा मी त्यांना रोज एक तास टीव्हीवर दिसणार आहे तर याचाही त्यांना वेगळाच आनंद आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा माझ्या घरचेच जास्त उत्सुक आहेत”.
यापुढे तिने हार्दिकच्या प्रतिक्रियेवरही असं म्हटलं की, “मालिकेच्या निमित्ताने हार्दिकही खूप आनंदी होता. मी पुन्हा एकदा काम सुरु केलं आहे याचा त्याला आनंद होता. याआधी असं व्हायचं आणि आताही असं होणार आहे की, आज तू असं काम का केलंस?, तू असं नव्हतं करायला पाहिजे, भावना अशी का आहे? मग तू का रडत होतीस? असे मला अनेक कॉल येणार आहेत”.
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर हिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अक्षयाने साकारलेली अंजली पाठक ही भूमिका प्रेक्षकांना भावली होती. २०१६ ते २०२१ तब्बल पाच वर्षे ही मालिका सुरु होती. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षयाची भूमिका काय असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.