मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मुग्धा व प्रथमेश ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले तेव्हापासूनच त्यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Anniversary)
गेल्यावर्षी म्हणजेच २१ डिसेंबर २०२३ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला मित्रपरिवार व कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा. दोघांनीही अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच त्यांचे लग्नापूर्वीचे विधी उरकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आणखी वाचा – एकीकडे अप्पी-अर्जुनचे लग्न, तर दुसरीकडे अमोलची आयुष्याशी झुंज, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका निर्णायक वळणावर
अशातच आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. “आमच्या चि व चि सौ कां ते श्री व सौ च्या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालं” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. मुग्धा-प्रथमेश यांनी लग्नात खास लूक केला होता. यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी व प्रथमेशने मरुन रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर असा खास लूक केला होता. तसंच डोक्यावर पेशवाई स्टाइल पगडीही घेतली होती.
मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे हे फोटो व त्यांची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी दोघांना त्यांच्या लग्नाच्या वर्षपुर्तीनिमित्त कमेंट्स करत खास शुभेच्छाही दिल्या आहेत. “खूप खूप अभिनंदन”, “खूप खूप शुभेच्छा”, “असेच कायम एकत्र राहा” अशा कमेंटसद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.