अभिनेता सनी देओलच्या एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्याचा रस्त्यावर भटकतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओबद्दल दारूच्या नशेत अभिनेता स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल रात्री अपरात्री भटकत असल्याच समोर आलं आहे. सनी देओल रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे पाहून ऑटोचालक रिक्षा थांबवतो आणि अभिनेत्याला आधार देत कसा तरी त्याला त्याच्या ऑटोमध्ये बसवतो. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Sunny Deol Viral Video)
नुकतेच ‘गदर २’चे अभूतपूर्व यश साजरे करणाऱ्या सनी देओलचा नशेत व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. krk ने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “हा खूप धक्कादायक व्हिडीओ आहे”. सनी जुहूमध्ये रस्त्यावर नशेत नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल रस्त्याच्या मधोमध कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. तर त्याच्या बाजूला रिक्षा येऊन थांबताच त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच हसू पाहायला मिळत आहे. यानंतर चालक अभिनेत्याला मदत करून ऑटोमध्ये बसवतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक संतापले आणि आश्चर्यचकित झाले आहेत. काही जण म्हणाले आहेत की, “या माणसाला काय अडचण आहे? दहा वर्षांत एका यशस्वी चित्रपटानंतर तो आता स्वत:ला हरवून बसला आहे”. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, “बॉलीवूडमधील प्रत्येकजण ड्रगिस्ट आहे” अशी कमेंट करत त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. दरम्यान सनीच्या काही चाहत्यांनी मात्र, “शशांक उद्रापूरकर दिग्दर्शित ‘सफर’ चित्रपटाच्या शूटिंगमधील ही दृश्ये आहेत”, असे म्हटले आहे.
यासोबतच सनी देओलने सोशल मीडियावर पोस्ट करत या व्हायरल व्हिडीओचे सत्य उघड केले आहे. सनी देओलने या प्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याच्यासह अनेक सहकलाकार देखील आहेत. सनी देओलने हा व्हिडीओ शेअर करत “अफवांचा प्रवास फक्त इथेच आहे” असे लिहिले आहे.