सप्टेंबर २०२४ मध्ये आदिती राव हैदरीबरोबरच्या लग्नामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता सिद्धार्थने दक्षिणेतील काही बड्या कलाकारांवर ताशेरे ओढले आहेत. हैदराबाद लिटररी फेस्टिव्हलमध्ये तो पोहोचला होता. यावेळी चित्रपट आणि पुस्तकांबद्दलच्या प्रेमाबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितले की, तो तमिळ-तेलुगू चित्रपटात मोठे स्टारडम मिळवू शकला नाही. कारण त्याने पडद्यावर महिलांना कानाखाली मारणे किंवा महिलांच्या नाभीला चिमटे मारणे यासारखे दृश्ये करण्यास नकार दिला. सिद्धार्थ कार्यक्रमात त्याच्या सासूशी, म्हणजेच अभिनेत्री अदिती राव हैदरीची आई विद्या रावशी याबद्दल बोलत होता. (Actor Siddharth on his stardom)
यादरम्यान, एका प्रश्नाचे उत्तर देताना त्याने खुलासा केला की, जर त्याने एखाद्या प्रोजेक्टला ‘हो’ म्हटले असते तर आज तो ‘मोठा फिल्मस्टार’ झाला असता. याबद्दल सिद्धार्थ म्हणाला की, “मला अशा स्क्रिप्ट मिळत असत, ज्यात मी महिलांना कानाखाली मारायचे, आयटम साँग करायचे, किंवा एखाद्या महिलेच्या पोटाला चिमटे काढायचे. एखाद्या महिलेने काय करावे?, कुठे जायचे? हे सांगायचे. त्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट चांगल्या असत्या तर ते उत्तम, यशस्वी चित्रपट ठरले असते. पण मी त्यांना नकार दिला. जर मी वेगळा विचार केला असता तर कदाचित आज मी एक मोठा फिल्मस्टार झालो असतो”.
यापुढे सिद्धार्थ म्हणाला, “मग मी माझ्या आवडीनुसार काम केले. आज लोक मला सांगतात की, तू चित्रपटात स्त्रियांचा आदर करतोस, तुझे पालकांशी चांगले संबंध आहेत, तू मुलांशी चांगले वागतोस, तू सुंदर दिसतो. लोक म्हणतात की, आजची मुलंही माझे १५ वर्षांपूर्वीचे चित्रपट बघतात. त्यातून खूप समाधान मिळते. ही काही कोटींमध्ये मोजता येणारी गोष्ट नाही. पण माझ्यासाठी हे सुखावणारे आहे”.
आणखी वाचा – महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, राजकुमार रावच्या भावाबरोबर साकारणार भूमिका
यानंतर सिद्धार्थने कोणाचेही नाव न घेता उपहासाने म्हटलं की, “माझ्या सभोवतालचे प्रत्येकजण आक्रमक, क्रूर आणि मर्दानी नायक बनण्याचा प्रयत्न करीत होता. ते सर्व बोलत होते जसे की, मर्द को कभी दर्द नही होता, परंतु मला स्क्रीनवर रडल्याचा अभिनय करताना आनंद व्हायचा”.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती
दरम्यान, सिद्धार्थ नुकताच ‘मिस यू’ या तमिळ सिनेमात दिसला. आता त्याचा आगामी ‘द टेस्ट’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता आर. माधवनही आहे. शिवाय त्याचा ‘इंडियन ३’ही प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षीच सिद्धार्थने अदिती राव हैदरीबरोबर लग्नगाठ बांधली. यामुळे ही जोडी अधिक चर्चेत आली होती.