अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील बेधडक जोडी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मिताली तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती ट्रोल होतानाही दिसते. मात्र ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची मितालीने बोलतीही बंद केली आहे. बरेचदा मितालीला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर तिचा पती सिद्धार्थने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावलेले पाहायला मिळाले. (Mitali Mayekar Story Viral)
मितालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मिताली व सिद्धार्थ ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मिताली सध्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे अधिक लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच ती स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. मितालीला जग फिरण्याची विशेष आवड आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती परदेश दौरे करताना दिसत आहे. नुकतीच मिताली टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्टसाठी लंडन येथे गेली होती. लंडन येथे फिरतानाचे अनेक फोटो मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

लंडन दौरा करुन आता मिताली पुन्हा घरी परतली आहे. यावेळी मितालीच्या नवऱ्याने म्हणजेच सिद्धार्थने तिला खास सरप्राइज देत तिचं स्वागतही केलं. सिद्धार्थने “मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल की हे सर्व मी स्वतःहून तुझ्यासाठी केल्याबद्दल तुला माझा अभिमान वाटेल. वा काय प्रवास होता आणि किती मोठा प्रवास होता. आता माझ्या बाळाचे घरी स्वागत आहे. आणि मी हे स्वागत अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे”, अशी नोट लिहित मिताली मयेकरचं स्वागत केलं.
“तुझ्यासाठी इथे एक छोटंसं सरप्राइज आहे”, असं म्हणत सिद्धार्थने एक नोट त्यांच्या फ्रिजवर ठेवली होती. मितालीने हा फोटो शेअर करत “हे रहस्य उत्सुकता वाढवत आहे”, असं म्हटलं. त्यानंतर मितालीने लगेचच दुसरी स्टोरी शेअर केली, यामध्ये तिने, “पहिल्यांदा हा प्रयत्न केला. ते कसं झालं असेल हे मला माहित नाही. तुला ते आवडेल अशी आशा आहे”, अशी सिद्धार्थची नोट आणि त्याने तिच्यासाठी पहिल्यांदा बनवलेला खास पदार्थ ठेवला होता. ही स्टोरी शेअर करत मितालीने, “अरे देवा. हा माणूस म्हणजे माझ्यासाठी जॅकपॉट लागला आहे. काय स्वागत आहे”, असं म्हणत तिने तिच्या स्वागताबाबतचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.