कठोर, बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी आजवर त्यांच्या नारळासारख्या आतून गोड आणि बाहेरून कठोर असलेल्या स्वभावाने प्रेक्षकांची मन जिंकली. नानांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. नाना पाटेकर यांचं व्यक्तिमत्व नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अशातच नानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला आहे. (Nana Patekar Viral Video)
नाना पाटेकर सध्या एका बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नाना पाटेकर बनारस येथे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. अभिनेता उत्कर्ष शर्मा व नाना पाटेकर ‘जर्नी’ सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्यांच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील नानांच्या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरं या कृतीमुळे नाना टीकेचे धनी बनले आहेत.
बनारसमध्ये शूटिंग करत असतानाचा नानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतं आहे की, एका इसमाला नानांनी जोरदार टपली मारल्याचे एका कॅमेऱ्यात कैद झाले अन् तो व्हिडिओ काहीच क्षणात सोशल मीडियावरून वाऱ्यासारखा व्हायरल झाला. दरम्यान नानांचा एक चाहता त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला होता. नाना सीनदरम्यान चित्रीकरण करत असताना त्यांचा हा चाहता मध्येच आला आणि त्यांच्या बाजूला उभा राहून फोटो काढू लागला. त्यावेळी नानांना चाहत्यांचा प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात जोरदार टपली मारली.
नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत असतात. तसेच ते त्यांच्या रागीट स्वभावामुळेही ओळखले जातात. बरेचदा त्यांनी बड्या कलाकारांच्या सिनेसृष्टीतील वावरावरून भाष्य केलेलं ही पाहायला मिळतं. सध्या नानांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून या व्हिडिओला पाहून नानांवर जोरदार टीकाही करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.