बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यापैकी एक म्हणजे नाना पाटेकर. आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल ६ वर्षांनंतर ते पुन्हा चित्रपटात दिसणार आहेत. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. विवेक दिग्दर्शित या चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नानांनी जवळपास साडेचार दशकं चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. १९७८ साली आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नानांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला. इतकंच नाही तर २०१३ साली त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. (Nana says about padmashri award)
नुकतंच ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नवभारत टाईम्यला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आपल्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार का दिला आहे, या मागचं कारण माहित नसल्याचं वक्तव्य केलं.त्यांना पद्मश्री पुरस्काराबाबत विचारलं असता नाना म्हणाले, “मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, पण त्यामागचं कारण मला माहित नाही. मी असं काहीच केलं नाही की हा पुरस्कार मला दिला गेला? नानाला पद्मश्री पुरस्कार का दिला गेला, हा प्रश्न खरं तर लोकांनी विचारला पाहिजे. या पुरस्काराचा एक आदर आहे. तो आदर नानासारख्या माणसाला हा पुरस्कार देऊन का दिला?”, असा प्रश्न त्यांनी विचारला.
पुढे नाना म्हणाले, “जेव्हा कोणालाही भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभुषण पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्यामागे विशिष्ट कारणंही विचारणं अपेक्षित आहे. कलाकारांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, खेळाडुंसाठी खेळरत्न पुरस्कार आहे. तर भारतरत्न हा ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा ठेवत नाहीत ”.
नानांनी बाबा आमटे यांच्याबाबत सांगितलं, “बाबा आमटेचं काम खूप मोठं आहे. त्यांना भारतरत्न मिळायला हवा होता. त्यांचा बायोपिक मला करायला नक्की आवडेल”, असं म्हणत त्यांनी आपला बाबा आमटे यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.