Madhav Abhyankar wedding : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘आम्ही सारे खवय्ये-जोडीचा मामला’ हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मराठमोळा आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा शो होस्ट करत आहे. आजवर या शोमध्ये अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या पार्टनरसह सहभाग घेत लव्हस्टोरी, त्यांच्या संसारातील चढ-उतार सांगितले. अशातच नुकत्याच झालेल्या भागात ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता माधव अभ्यंकर यांनी पत्नीसह हजेरी लावली. रात्रीस खेळ चाले मालिकेतील त्यांची अण्णा नाईक ही भूमिका प्रचंड गाजली. आज त्यांना संबंध महाराष्ट्र अण्णा नाईक याच नावाने ओळखतो. माधव अभ्यंकर यांनी नुकत्याच या शोमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.
या शोमध्ये माधव अभ्यंकर त्यांची लव्हस्टोरी सांगत म्हणाले, “२०१२ मध्ये आम्ही दोघं भेटलो आणि २०१४ मध्ये आम्ही लग्न केलं. आमचं हे दुसरं लग्न आहे. आमची एक कॉमन मैत्रीण आहे तिने माझ्याबद्दल हिला सुचवलं होतं. त्यावेळी रेखा नाटक वगैरे काहीच बघायची नाही. मी कोण आहे? काय काम करतोय तिला काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर हळुहळू आम्ही संपर्कात आलो. फेसबुकवर मॅसेज करुन एकमेकांशी बोलत होतो असं जवळपास वर्षभर आमचं बोलणं सुरु होतं”.
आणखी वाचा – लेकाच्या जन्मानंतर कतरीना कैफ दिसतेय अशी, नवऱ्यानेच सांगितलं खरं कारण, म्हणाला, “पुरेशी झोप नाही…”
पुढे ते म्हणाले, “मग एकेदिवशी मी तिला म्हटलं. माझ्या नाटकाचा प्रयोग आहे नक्की बघायला ये. त्यानंतर ती नाटक पाहायला आली. तेव्हा माझा जो फेसबुकवर फोटो तो जरा तरुणपणीचा होता. त्यामुळे नाटकाला आल्यावर हिने मला प्रत्यक्षात जेव्हा पाहिलं तेव्हा ही माझ्याजवळ आलीच नाही. काका-काकू मला भेटायला आले पण, ही लांबूनच मला निरखत होती”.
माधव अभ्यंकर असं म्हणताच पुढे रेखा म्हणाल्या, “मी निरखून पाहत होते कारण, ही तिच व्यक्ती आहे का? जिला मी फोटोमध्ये पाहिलंय असा विचार माझ्या डोक्यात सुरु होता. बरं… या सगळ्यात आमचं एकमेकांशी आधीच सगळं बोलून झालं होतं, प्रॉमिस वगैरे केलेलं होतं. सगळं काही ठरलेलं होतं मग आता नकार तरी कसा देणार?”. यावर माधव अभ्यंकर म्हणाले, “पण तिने लगेच सगळं स्वीकारलं आणि २०१४ मध्ये आमचं लग्न झालं. तिच्यामुळे मला संपूर्ण कुटुंब मिळालं. दोन मुली, एक मुलगा, एक सून, दोन जावई, तीन नाती, दोन नातू”.





