नाटक, चित्रपटाबरोबरच ओटीटी माध्यमातूनही मराठीसह हिंदी प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतो. तो अभिनयाबरोबरच कवितांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ-२’ चित्रपटामधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त जितेंद्रने झी मराठीच्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यानचाच त्याचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Jitendra Joshi Video Viral)
झी मराठीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा एक प्रोमो शेअर केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही कार्यक्रमातील उपस्थितांना तसेच प्रेक्षकांना सांगते की, “आज तुमच्यामध्ये एक असा कलाकार आहे, जो अमराठी असला तरी मराठी मातीच्या मांडीवर बसून जन्माला आला आहे असं वाटतं. पण फार कमी लोकांना माहित आहे की तो मराठी नसून अमराठी आहे आणि तो अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी”.
यावर “मी जन्मत: मारवाडी असलो तरी मी मराठीच आहे. राजस्थानात जन्माला आलेला मुसलमान राजस्थानी असतो. तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी असतो” असं म्हणत तो त्याच्या मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करतो. यापुढे तो असं म्हणतो की, “माझ्या घरामध्ये मराठी बोललं जात नव्हतं. पण मग मुंबईत आल्यानंतर मला लक्षात आलं की, जर अभिनय या क्षेत्रात काम करायचं असेल तर भाषा खूप महत्त्वाची आहे. मला भाषेवरून हिणवलं गेलं आणि त्यामुळे मी मराठी भाषा शिकलो”.
यापुढे जितेंद्र कार्यक्रमातील स्पर्धकांविषयी आपलं मत मांडतो. तो म्हणतो, “जेव्हा गाणं किंवा कुठल्याही कलेमध्ये अंतरभाव असेल आणि ती भाषा रोजच्या जगण्यातील भाषा नसेल किंवा आपले आई-वडील ते बोलत नसलीत तर काय होतं ते मला ठाऊक आहे. पण एकदा एखाद्या भाषेची आवड लागली की कोणतीही भाषा परकी राहत नाही”. यानंतर जितेंद्र त्याच्या एका मित्राने आईसाठी केलेली एक कविता सादर करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्याबरोबरची आठवण सांगत एक किस्सादेखील शेअर करतो. सुरेशजींनी जितेंद्रला गुलाम अली यांची गाणी ऐकायला सांगितलं होतं आणि ही गाणी ऐकून त्याच्या अभिनयात आणि स्वत:मध्ये खूप बदल झाल्याचे सांगतो.
त्यानंतर मृण्मयी जितेंद्रला कविता सादर करायला सांगते. तेव्हा जितेंद्र त्याच्या मित्राने लिहिलेली आईवरील एक सुंदर कविता सादर करतो. ही कविता सादर केल्यानंतर पुढे जितेंद्र म्हणतो, “मला मराठीचं ज्ञान नाही. पण मराठी भाषेची मला चांगली समज आहे. मला मराठी भाषा आवडते. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर जो जय म्हणतो आणि ज्याच्या अंगावर काटा फुलतो तो मराठी”. दरम्यान जितेंद्रचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्याचं कौतुक होत आहे.