मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. या कपलने ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले होते. आजही एक आदर्श म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश यांना डान्सची आवड आहे. त्यामुळे हे दोघेही त्यांची डान्सची आवड पूर्ण करताना दिसून येतात. अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. (Avinash Narkar Father in Law)
अशातच त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अविनाश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सासऱ्यांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्यांचे कौतुक केलं जात आहे. अविनाश यांनी सासऱ्यांबरोबरचा फोटो शेअर करत या फोटोला त्यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गाणं लावलं आहे. या फोटोमध्ये अविनाश व त्यांचे सासरे हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अविनाश यांनी सासऱ्यांसाठी खास पोस्टही लिहिली आहे.
या पोस्टमध्ये अविनाश यांनी असं लिहिलं आहे की, “ज्यांनी माझं अख्खं आयुष्य, माझं संपूर्ण जगणं सर्वार्थाने ऐश्वर्य संपन्न केलं त्या या माझ्या सासरेबुवांचे… निर्मळ मनाच्या बाबांचे उपकार खरंच साता जन्मात फेडू शकणार नाही मी…” अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच त्यांच्या या पोस्टचे कौतुकही केलं आहे. याशिवाय ऐश्वर्या नारकरांनीसुद्धा ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
दरम्यान, अविनाश नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांची ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. त्यानंतर अविनाश काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकले. अशातच ते आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.