मराठी मनोरंजन विश्वात ‘बोल्ड, बिनधास्त अन् ब्युटीफूल’ अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी, हिंदीसह सईने इतर भाषांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत तिने चाहत्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना तिच्याविषयीचे अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.
सईचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्याविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना अधिकच रस असतो. अशातच अभिनेत्रीने तिच्या प्रॉपर्टी व वैयक्तिक आयुष्याबबत काही खुलासे केले आहेत. सई सध्या तिच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच नुकतीच तिने ‘मुंबई तक’ या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या प्रॉपर्टी व वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
या मुलाखतीत सईला लोकांनी तिच्याविषयी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला “तिचं वय किती आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर सईने “माझे वय सदतीस असून २५ जून १९८६ ही माझी जन्मतारीख आहे” असे म्हटले. यानंतर तिला सई ताम्हणकर “मुंबईत कुठे राहते?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत तिने नेमके ठिकाण न सांगता मी पश्चिम उपनगरमध्ये राहत असल्याचे म्हटले.
यापुढे सईला “तिची प्रॉपर्टी किती आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. तर याचे गंमतीशीर उत्तर देत सई असं म्हणाली की, “तुम्हाला (लोकांना) वाटते तितकी नाही.” मग यानंतर तिला “सई ताम्हणकर सिंगल आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर सईने “it’s complicated” असं दिलं.
दरम्यान, सई ताम्हणकरचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही आहे. तर आगामी काळात तिचा भूमी पेडणेकर बरोबर भक्षक हा चित्रपट येणार असून यात सई एका पोलीसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत.