‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झालेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. मराठी मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये अभिनय करत अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गत आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिजीत हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो, सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Abhijeet Khandkekar On Instagram)
अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर पत्नीसाठी एक खास पोस्ट केली आहे. अभिजीतप्रमाणे सुखदादेखील उत्तम अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अजातशत्रू’ या हिंदी नाटकात झळकत आहे. त्याने या नाटकाचा प्रयोग पाहून तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “काल इब्सेन फेस्टीवलमधील इला अरूण यांनी रूपांतरीत केलेलं आणि इला अरूण आणि के.के.रैना सरांनी दिग्दर्शित केलेलं ‘अजातशत्रू’ हे हिंदी नाटक पाहायचा योग आला. अत्यंत गंभीर विषयावरचं पण तितकंच प्रभावीपणे सादर केलेलं नाटक सगळ्यांनी पहावं असच आहे.”
यापुढे अभिजीतने पत्नीचे कौतुक करत असे म्हटले की, “या सगळ्यात उठून दिसणारी – सुखदा. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकाच नाटकात दोन पात्रांचा अभ्यास करणं आणि त्या दोन्हींपैकी कुठलं छान साकारलं म्हणून प्रेक्षकांना तितकंच बुचकळ्यात पाडावं हे तुच करू जाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेसची तुझ्या मेहेनतीचा मी सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे. इतकी मेहनत, इतकं समर्पण, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी म्हणून असलेला पराकोटीचा अट्टाहास व तळमळ बघून एखाद्या वर्गात सतत पहिल्या येणाऱ्या मुलीबद्दल जशी असुया वाटते ना तशी वाटते आणि त्याचबरोबर अभिमानही वाटतो. इतकं सगळं करुन मंचावरचा तुझा वावर, तुझं सहज ते पात्र होऊन जाणं, हिंदीवरचं प्रभुत्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत नसेल तर नवलच. खूप प्रेम व प्रचंड आदर”.
आणखी वाचा – मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”
अभिजीतच्या या पोस्टवर या पोस्टवर सुखदा खांडकेकरनेही कमेंट करत “तू (अभिजीत) आहेस म्हणून मी आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे”, असे म्हटले आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे या पोस्टवर सुखदावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.