अभिनेता आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी नेहमीच चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. अशातच आता आमिर खानने केलेलं एक भाष्य चर्चेत आलं आहे. आमिर खानने अखेर त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत मौन सोडले आहे. नुकतीच आमिर खानने रिया चक्रवर्तीला मुलाखत दिली. यावेळी रियाने आमिर खानला लग्नाबद्दल काही सल्ला देण्यास सांगितले होते, ज्याला आमिरने स्पष्टपणे नकार दिला आणि त्याच्या दोन अयशस्वी विवाहांच उदाहरण दिलं. (Aamir Khan On Wedding)
अभिनेत्याने या संवादादरम्यान असे सांगितले की, त्याला जोडीदाराची गरज आहे. यावेळी बोलताना त्याने त्याच्या दोन्ही माजी पत्नींचाही उल्लेख केला. संवादादरम्यान आमिर खान म्हणाला, “मला एकटे राहणे अजिबात आवडत नाही. मला जोडीदार हवा आहे. मी एकटा माणूस नाही, मला कंपनी आवडते. मी माझ्या दोन्ही माजी पत्नी रीना व किरण यांच्या खूप जवळ आहे. आम्ही सगळे एका कुटुंबासारखे आहोत”.
याशिवाय रियाला आमिर खानकडून लग्नाबद्दलचे त्याचे मत जाणून घ्यायचे होते. यावर आमिर म्हणाला, “माझी दोन लग्न अयशस्वी झाली आहेत. त्यामुळे मला लग्नाबाबत कोणताही सल्ला विचारु नका”. याशिवाय जेव्हा आमिरला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मी आता ५९ वर्षांचा आहे. आता पुन्हा लग्न कुठे करणार? हे अवघड दिसत आहे. माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत, मी माझ्या मुलांशी आणि कुटुंबाशी जोडलो गेलो आहे”.
आमिर खानने दोनदा लग्न केले असले तरी त्याची दोन्ही लग्ने अयशस्वी ठरली. त्याचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना जुनैद खान आणि आयरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याचे दुसरे लग्न दिग्दर्शक किरण राव यांच्याबरोबर झाले होते. किरण व आमिरला एक मुलगा आझाद हा आहे. आमिरचा मोठा मुलगा जुनैदनेही ‘महाराज’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.