अभिनेते अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयाबरोबरच ते त्यांचा दमदार आवाज, लेखन कला आणि नम्र स्वभाव यासाठीही ते लोकप्रिय आहेत. ग्लॅम आणि ग्लिट्जच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नुकताच तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनदेखील उपस्थित होता. यावेळी अभिनेत्याचा कृतीने लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि तेव्हापासून त्याचं कौतुक केलं जात आहे. (Abhishek Bachchan Wins Heart)
२४ एप्रिल २०२४ रोजी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे अमिताभ बच्चन यांना तिसऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर यांची मोठी बहीण व प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी अमिताभ यांना हा पुरस्कार दिला. २०२२ मध्ये लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी सुरु केलेला हा पुरस्कार अमिताभ यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्यात आला. यावर्षी एआर रहमान यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे लता मंगेशकर यांच्या आवाजावरील प्रेमाबद्दलही सांगितले.
या कार्यक्रमात रणदीप हुड्डा, अशोक सराफ, अभिषेक बच्चन, पद्मिनी कोल्हापुरे व रूपकुमार राठोड यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चनला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात असल्याचं दिसत आहे. पुष्पगुच्छ स्वीकारल्यानंतर तो स्टेजवरून बाहेर पडत असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने अभिषेकला स्टेजवर बसण्याची विनंती केली. पण वडिलांचा आदर करत अभिनेत्याने त्यांच्याजवळ बसण्यास नकार दिला आणि स्टेजवरून खाली प्रेक्षकांच्या दिशेने तो गेला.
अभिषेकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट होताच, नेटकऱ्यांनी बी-टाउनचा सर्वात नम्र, जाण असणारा व डाउन-टू-अर्थ कलाकार असल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “इतका छान स्वभाव. हे सर्व संगोपनातून येते”.