दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर नाव आहे. त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनयाने वेड लावले. लक्ष्मीकांत यांनी चंदेरी दुनियेसह रंगभूमीचे मंचदेखील गाजवले. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक अभिनय बेर्डेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत आहे. अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते?’ हा चित्रपट बराच गाजला.
‘ती सध्या काय करते?’नंतर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ या चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. चित्रपटांतून मनोरंजन केल्यानंतर अभिनय आता रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. सध्या तो ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतीच त्याने आरपार या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने त्याचे बाबा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आज असते तर मी कदाचित वेगळा व्यक्ती असतो असं म्हटलं.
आणखी वाचा – Video : बायकोचा दरारा! रितेश देशमुखने जिनिलियासमोर सुधारली ‘ती’ चूक, दादा-वहिनींचा व्हिडीओ चर्चेत
याबद्दल अभिनय असं म्हणाला की, “माहिती नाही. पण बाबा असते तर कदाचित मी व्यक्तीच वेगळा असतो. पूर्णपणे नाही पण कदाचित वेगळा व्यक्ती असतो. पण बाबा आता आले तर त्यानी माझं नाटक बघावं असं मला वाटेल. त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूप आवडेल. माझ्या नाटकाची अनाउन्समेन्ट (उद्घोषणा) त्यांच्याच आवाजात आहे. तर त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूपच मजा येईल”.
यापुढे तो असं म्हणाला की, “ते आज असते तर त्यांच्याबरोबर त्यांचचं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक करायला मज्जा आली असती. त्यामुळे ते आज असते तर खूप वेगळाच अनुभव आला असता. ते स्वत: खूप हजारजबाबी होते. त्यामुळे माझ्यात तो गुण त्यांच्याकडून आला आहे. विनोदही त्यांच्याकडूनच आला आहे आणि क्षितिज पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे टायमिंगही त्यांच्याकडून आला आहे”.