‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणजेच अभिनेता अक्षय केळकर हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे त्याचं आयुष्यचं बदललं. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षयने नाव कोरलं. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अक्षयने मेहनत करत खूप साऱ्या गोष्टी मिळवल्या. यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं स्वत:चं हक्काचं घर. काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईत स्वत:चं घर घेतलं. घर घेतल्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत…सगळे खास क्षण त्यानं चाहत्यांसोबत शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं एक व्हिडिओ शेअर करत घराची झलक शेअर केली होती. यावेळी त्याच्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
अक्षयनं त्याच्या घरात एक विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे. खिडकीवरच्या काचेत या विठ्ठलाचं प्रतिबिंब अगदी लाघवी दिसत आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या घरातील सुंदर अशा विठुरायाच्या मूर्तीचे दर्शन घडवले आहे. अशातच आता त्याने या मूर्तीचा आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मूर्तीची सजावट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरातील विठ्ठलाच्या मूर्तीला तो पीतांबर व डोक्यावर शेला बांधताना दिसत आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीच्या सजावटीसाठी त्याने आईच्या साड्यांचा वापर केला आहे. याचाच व्हिडीओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला असून त्याने याबद्दल त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “पांडुरंगाला विठू माउली म्हणतात. माझ्या माऊलीच्या म्हणजे माझ्या आईच्या आवडत्या साड्यांपासून माझ्या विठू माऊलीला सजवलं. एरवी साड्यांवर जीवापाड प्रेम करणारी माझी आई, मी तिच्या या अत्यंत आवडत्या दोन साड्या मागितल्यावर लगेच दिल्या”.
अक्षयच्या घराला या विठ्ठलाच्या मूर्तीने आणखीनच शोभा आली असल्याचे पाहायला मिळत आहे. घरातील ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, त्याने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अक्षय सध्या अबीर गुलाल या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.