‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले यांचा काही दिवसांपूर्वी शाही विवाहसोहळा संपन्न झाला. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली. मालिकाविश्वातील ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आली. विवाह होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली कोणत्याच माध्यमाद्वारे दिली नव्हती. तर थेट लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. (Yogita Chavan And Saorabh Chaughule)
योगिता सौरभच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला असून एक महिना पूर्ण होताच दोघांनी शेअर केलेल्या लग्न सोहळ्यातील खास क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. योगिताने ही पोस्ट शेअर करत, “बरोबर एक महिनाआधी ‘माझं’ आणि ‘मी’चं ‘आमचं’ आणि ‘आपलं’ झालं”, असं कॅप्शन दिलं. व्हिडीओच्या सुरुवातीला “सौरभ माझ्या आयुष्यात आला त्याच्या सहा महिन्यापूर्वी मी माझ्या आईला गमावलं. मी असं नाही म्हणत की, माझी काळजी घ्यायला आईने त्याला पाठवलं आहे”, असं म्हणत योगिता भावुक झाली. त्यानंतर या व्हिडीओमध्ये दोघांच्या खास लग्नसोहळ्यातील, हळदी समारंभातील तसेच संगीत सोहळ्यामधील खास क्षणांच्या व्हिडीओची झलक पाहायला मिळाली.
इतकंच नव्हे तर योगिता व सौरभ त्यांच्या लग्नात खूप खुश होते. दोघेही थिरकतानाही दिसले. या व्हिडीओमध्ये योगिता-सौरभचा रोमँटिक अंदाज खूप खास असल्याचंही दिसलं. मालिकेत जसजसं या दोघांचं नातं फुलत गेलं अगदी तसेच खऱ्या आयुष्यातही ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. ३ मार्चला सौरभ व योगिता यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
सौरभ व योगिता यांच्या लग्नातील या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील सातफेरे, वरात, वरमाला व लग्नविधींची झलक पाहायला मिळत आहे. सौरभ व योगिता दोघांनी यावेळी एकत्र ठेका धरलेला पाहायला मिळाला. त्यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार व कुटुंबीय यांनीही ठेका धरला.