‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमातील विनोटी छटेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार म्हणजे योगेश शिरसाट. उत्तम लेखक, तसेच उत्तम अभिनेता म्हणून आजवर योगेश यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. योगेश यांनी आजवर या कार्यक्रमामध्ये साकारलेल्या विविध भूमिका साऱ्यांच्या पसंतीस उतरल्या. रुपेरी पडद्यावरही त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात येण्याआधी त्यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या प्रसिद्ध कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Yogesh Shirsat Incident)
या कार्यक्रमांमध्ये काम करण्याआधी योगेश छोट्या, मोठ्या कार्यक्रमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकत होते. योगेश यांनी ‘क्राईम डायरी’ सारख्या मालिकेतूनही भूमिका साकारली. मात्र ‘क्राईम डायरी’मध्ये अभिनय करण्याने योगेशचं लग्न मोडलं असल्याचा खुलासा त्यांनी स्वतः मुलाखतीदरम्यान केला. योगेश यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी त्यांचं लग्न का आणि कशामुळे मोडलं याचा खुलासा केला. या मुलाखतीदरम्यान योगेश यांनी बऱ्याच गप्पाही मारल्या.
हा किस्सा सांगत योगेश म्हणाले, “क्राईम डायरी नावाची मालिका होती. त्याचं चित्रीकरण संभाजीनगरलाच होत होतं. महिन्यामधून सात दिवस ते चित्रीकरण असायचं. त्याच्यामध्ये मी काम करायला लागलो. खून, दरोडे, बलात्कार अशा सगळ्या भूमिका मी त्या मालिकेमध्ये साकारल्या. गुन्हेगाराच्या भूमिका त्यामध्ये होत्या. त्यामुळे माझं ठरलेलं लग्नही मोडलं. मुलगी पसंत केल्यानंतर लग्न ठरलं. मुलीलाही मी पसंत झालो”.
पुढे ते म्हणाले, “रात्री क्राइम डायरीला माझा एपिसोड लागला. सतत सात दिवस एक स्टोरी त्या मालिकेमध्ये सुरु होती. त्यामध्ये माझी भूमिका होती. त्या भागामध्ये मी गुन्हेगाराची भूमिका केली होती. मर्डर करुन त्याचे तुकडे करत ते तो कुत्र्यांना खायला द्यायचा. अशी ती माझी विकृत भूमिका होती. मुलीकडच्या लोकांनी ते पाहिलं. त्यांना माझं ते मालिकेतील रुप खरं वाटलं. ती मुलगी बोलली मला याच्याबरोबर राहायचंच नाही तुम्ही लग्न मोडा. तसं ते माझं लग्न मोडलं”.