‘आई कुठे काय करते’ मालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बरेचदा मालिका तिच्या कथानकामुळे ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली. अशातच मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर मालिकेला नवं वळण मिळालं आहे. मालिकेत आशुतोषच्या मृत्यूने अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सुलेखा ताई लेकाच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. त्यामुळे कांचन अरुंधतीला घेऊन देशमुखांच्या घरी येते. (Aai Kuthe Kay Karte Promo)
अरुंधती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. देशमुखांच्या घरी अरुंधतीला राहायला आल्याचं संजनाला पटलेलं नसतं. संजना वेळोवेळी तसं बोलूनही दाखवते. मात्र घरातील इतर मंडळी अरुंधतीच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. तर एकीकडे संजना व अनिरुद्ध यांच्यातील वाद वाढत असतो. संजना अनिरुद्धकडे डिवोर्सही मागते. भर होळीत संजना अनिरुद्धकडे डिवोर्सचे पेपर्स देते. त्यावेळी घरातील इतर मंडळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात.
अशातच नुकत्याच समोर आलेल्या आणखी एका प्रोमोने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. या प्रोमोमध्ये गुढीपाडवा विशेष भाग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त सगळेचजण गुढी उभारण्यासाठी जमलेले असतात. यावेळी अनघा व अभिषेक देशमुखांच्या घरची गुढी उभारतात. त्यावेळी सगळेचजण जमलेले असतात. गुढी उभारल्यानंतर यश फॅमिली फोटो घेतो. मात्र त्या फॅमिली फोटोमध्ये संजना नसते. फॅमिली फोटो घेल्यानंतर संजना गुढी घेऊन बाहेर येते.
संजनाला गुढी घेऊन येताना पाहून कांचन तिला गुढी आताच उभारली, अशा दोन गुढ्या उभारणं चुकीचं आहे असं सांगते. यावर संजना माझ्याशिवाय गुढी उभारलात असं म्हणत पुन्हा वेगळी गुढी उभारण्याबाबत सांगते. यावर अनिरुद्धही आताच गुढी उभारून झाल्याच सांगतो. मात्र संजना कोणाचं ऐकत नाही. संजना देशमुखांना बोल लावताना दिसते, मी माझी जागा, हक्क कोणाला देणार नाही. आणि मला माझी जागा कशी मिळवायची हे बरोबर कळतं, असं म्हणते. त्यानंतर प्रोमोमध्ये संजना वेगळी गुढी उभारताना दिसली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.