प्रसिद्ध के-पॉप गायिका पार्क बो राम हिचं ११ एप्रिल मंगळवार रोजी निधन झाले. अवघ्या वयाच्या ३०व्या वर्षी गायिकेने अखेरचा श्वास घेतला. ‘Xanadu एंटरटेनमेंट’ या एजन्सीकडून गायिकेच्या मृत्यूची बातमी समोर आली. पेशाने गीतकार व अभिनेत्रीही असलेल्या या गायिकेचे कोरियामध्ये आकस्मिक निधन झाले असल्याचे समोर आले. सध्या गायिकेच्या मृत्यूचा पोलिस तपास सुरु असून, मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अहवालानुसार, पार्क बो राम या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणाऱ्या तिच्या दोन नव्या गाण्यांवर काम करत होती. (South Korean singer Park Bo Ram died)
पार्क बो राम हिने वयाच्या १७ व्या वर्षी के-पॉप उद्योगात प्रवेश केला. २०१० मध्ये ‘सुपर स्टार के २’ या रिऍलिटी शोमध्ये तिने भाग घेतला. तेव्हा ती शालेय शिक्षण घेत होती. जिला R&B संगीताची आवड होती. या शोमध्ये पार्क अंतिम फेरीतील एक बनली आणि आठव्या स्थानावर स्पर्धा पूर्ण केली. पॉप संगीताच्या जगात तिचे अधिकृत पदार्पण २०१४ मध्ये झाले. त्यावेळी तिने तिचं ‘ब्युटीफुल’ हे गाणं प्रदर्शित केलं. ज्यामध्ये रॅपर झिको देखील होता.
एका अहवालात असे म्हटले आहे की, नामयांगजू पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक अहवाल दाखल केला ज्यात दावा केला होता की, पार्क बो राम तिच्या मृत्यूच्या काही तास आधी एका खासगी पार्टीमध्ये गेली होती. या पार्टीत ती दोन मित्रांबरोबर मद्यपान करत होती. रिपोर्टनुसार, गायिका रात्री ९. ५५ ला वॉशरुममध्ये गेली परंतु काही काळ ती वॉशरूममधून परतली नाही. जेव्हा तिचे मित्र तिला शोधण्यासाठी गेले, तेव्हा ती सिंकवर बेशुद्ध अवस्थेत आढळली.
तिच्या एजन्सीने ही बातमी सांगताना लिहिलं की, ‘“हे XANADU एंटरटेनमेंट आहे. आम्ही अत्यंत दु:खद बातमी शेअर करत आहोत. पार्क बो राम हिचे ११ एप्रिल रोजी रात्री उशिरा अचानक निधन झालं. XANADU एंटरटेनमेंटचे सर्व कलाकार आणि अधिकारी याबद्दल अत्यंत शोक व्यक्त करत आहेत. पार्क बो रामला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांना ही बातमी सांगावी लागली हे आणखी हृदयद्रावक आहे. मृताच्या कुटुंबीयांशी चर्चा करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा, आम्ही मृत व्यक्तीला मनापासून श्रद्धांजली वाहतो जेणेकरून तिला शांती मिळावी”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.