मराठी मालिकाविश्वातीत लोकप्रियतेचं शिखर गाठवणाऱ्या मालिकांपैकी एक ‘आई कुठे काय करते’ मालिका आहे. लवकरच ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पाच वर्षांच्या या प्रवासात देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. रसिक प्रेक्षकांनीही देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला. पण ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतोच. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Milind Gawli On Aai Kuthe Kay Karte)
गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. अशातच काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून मालिका बंद होणार असल्याचं जाहीर केलं. अशातच त्यांनी मी रिटायरमेंटचा विचार करत असताना ही भूमिका माझ्याकडे आली असं म्हटलं आहे.
मालिकेच्या निरोपानिमित्त इट्स मज्जाने अनिरुद्ध फेम अभिनेते मिळणद गवळी यांच्याशी खास संवाद साधला. तेव्हा आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी रिटायर झालो होतो. ज्यावेळी हीरो म्हणून मला कामे मिळतील असं वाटत नव्हतं. काही महीने घरी बसलो होतो आणि मालिका मी कधीच करत नव्हतो. मला करायच्या नव्हत्या. कारण पडद्यावर आपण फार लोकप्रिय राहणार नाही असं मला वाटत होतं. मग शशांक सोळंकीने मला ‘तू अशी जवळी रहा’ आणि ‘सारे तुझ्यासाठी’ अशा मालिकांमध्ये काम दिले. या मालिकेनंतर मला ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी बोलवण्यात आले.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्यानंतर मग या मालिकेतील भूमिकेबद्दल मला सांगण्यात आले. मालिकेतील अनिरुद्ध या पात्राचे नेमकं काम काय? हे सगळं सांगण्यात आले. मग हळूहळू या पात्राचे कंगोरे समोर आले. काही वेळेस अनिरुद्धचा राग यायचा, कधी त्याची माया वाटायची. कधी त्याला शिव्या द्यायचे. असं करत करत मालिकेला आणि अनिरुद्ध या पात्राला एकूण पाच वर्षे कशी झाली कळलच नाही”.