बॉलिवूड अभिनेता सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत. गेल्या २० दिवसांत त्याला अनेक धमक्या मिळाल्या आहेत. अशातच आता अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकवण्यात आलं आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे आता सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावरच मिळाल्याचं म्हटलं जात आहे. धमकी देताना यात एका गाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. (Salman Khan Again Threatened by Lawrence Bishnoi)
काही वृत्तानुसार, धमकीच्या मॅसेजमध्ये सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर एक गाणे लिहिले आहे. गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात ठार मारले जाईल, असे या धमकीत म्हटले आहे. त्याची अवस्था अशी होईल की त्याला स्वतःच्या नावाने गाणी लिहिता येणार नाहीत. तसंच धमकी देणाऱ्यानं सलमान खानला खुलं आवाहन दिलं आहे की, हिंमत असेल तर हे गाणं लिहिणाऱ्याला वाचवा .यानंतर पोलिस आता या धमकीचा तपास करत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम डीपी दादासाठी इरिनाने बनवलं खास मटण, त्यानेही ताव मारला अन्…; म्हणाली, “भावा नुसतं….”
काही दिवसांपूर्वी याच हेल्पलाइनवर एक मॅसेज आला होता. यामध्ये मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे. सलमान खान, वाद मिटवायचा असेल तर पाच कोटी रुपये देण्यात यावे आणि काळवीट हत्याप्रकरणात मंदिरात जाऊन माफी मागावी. नाही तर वाईट परिणाम होतील, असं या मॅसेजमध्ये म्हटलं गेलं होतं. याबाबत वाहतूक पोलिसांनी माहिती देताच वरळी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात एका आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ दिवसांत सलमान खानला पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. याआधीही त्याला तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अभिनेता सलमान खान सध्या हैदराबादमध्ये आहे. तो त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत.