छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीलाने जहागीरदारांचे घर सोडले. लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली होती. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून यावेळे एजेंनी तिला या घरात नीट वागायचे नसेल तर घर सोडून जा असं म्हटलं. यावर लीलाने घर सोडले. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
एजे व लीला यांचे लग्न झाले असले तरी एजेंनी अजून लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. मात्र नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये एजे लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत तिचा बायको म्हणून स्वीकार केला. जहागीरदारांच्या घरात दिवाळीच्या पूजेनिमित्त सगळे जमलेले असतात. पण या पूजेला लीला नसते. तेव्हा एजे तिच्याबद्दल आईला विचारतात. त्यांतर एजे स्वत: लीलाला बोलवण्यासाठी जातात. तेव्हा लीला आपल्या मनातील खंत एजेंना बोलून दाखवते. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात लीला आता एजेंबरोबर दिवाळी पाडवा साजरा करणार आहे.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये लीला एजेंना पाडव्यासाठी उटणं लावायला त्यांच्या खोलीतून खाली सर्वांसमोर घेऊन येते. यावर एजे तिला “मी असं काहीही करणार नाहीये” म्हणतात. पण लीला त्यांना दम देत “गपचूप पाटावर बसा नाहीतर जो माझं ऐकतो त्याला मी बोलवेन” असं म्हणत त्यांच्या पाळीव श्वानाला बोलवते. त्यानंतर एजे शेवटी पाटावर उटणं लावण्यासाठी बसतात आणि लीला त्यांना उटणं लावत त्यांचा पहिला दिवाळी पाडवा साजरा करते.
दरम्यान, मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच मालिकेच्या चाहत्यांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या प्रोमोखाली एकाने “हे दोघे मला खूप आनंदित करतात” असं म्हटलं आहे तर आणखी एकाने “किती गोड आहेत लीला आणि एजे” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी या नवीन ट्विस्टसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांना एजे व लीला यांच्यातील प्रेमकहाणी बहरत असल्याचे आवडत आहे असं म्हटलं आहे