Sumant Thakre Ganeshotsav : देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच अनेक मराठी कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. या कलाकारांनी त्यांचे गणरायाबरोबरचे अनेक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्यानेही त्याच्या घरच्या बाप्पाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. ‘आई कुठे…’ फेम अभिनेता सुमंत ठाकरेच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आणि सुमंतने त्याच्या बाप्पाबरोबरचे अनेक फोटो पोस्ट करत त्याखाली दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सुमंत ठाकरेने त्याच्या बाप्पाबरोबरचे अनेक फोटो पोस्ट करत बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सुमंतने असं म्हटलं आहे की, “जर कुणी मला विचारलं किंवा नाही जरी विचारलं की, कुठला दिवस पुन्हा जगायला आवडेल?, तर माझं उत्तर हेच असेल की माझ्या बालपणातील गणेशउत्सवाचे १० दिवस. धर्म, आपण आणि इतर, कोण श्रेष्ठ, या पलीकडे असलेल्या निरागसतेचे, कल्पनाशक्तीला खतपाणी घालणारे, कलेची लागवड करणारे, शांततेचे, समृद्धीचे आणि प्रेमाचे दिवस होते ते”.
पुढे तो म्हणाला, “गणपती आगमनाच्या आधीची लगबग, मंडळाची कामे, देखावा कसा भारी दिसेल यासाठी शक्कल लढवणे, घरच्या गणपतीची तयारी, रंगकाम, साफसफाई, मिरवणूक, भेटीगाठी, आरत्या, धुपाचे वास, प्रसाद, वेगवेगळ्या स्पर्धा, गाणी (DJ वर नव्हे), नृत्य, स्पर्धा, बक्षिसं आणि हे सगळं होऊन मग निरोप. पुन्हा कधी येतील का असे दिवस माहीत नाही पण त्या आशेत आणि आपल्याला कळत गेलेली प्रश्नांची उत्तरं पुढच्या पिढीला सांगत, त्यांच्या बालपणीच्या आठवणी स्वच्छ तयार करत, आपलं बालपण पुन्हा जगून घेऊ, गणेशोत्सव साजरा करत राहू”.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते निधन बाळ कर्वे यांचे निधन, वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सुमंत ठाकरेबद्दल बोलायचे झाले तर, सुमंतला आई कुठे काय करते मालिकेतील अनिश या पात्रामुळे प्रसिद्धी मिळाली. सुमंतने या मालिकेत अरुंधतीच्या जावयाची म्हणजेच ईशाच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.





