छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकरने तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. मधुराणी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (Madhurani Prabhulkar On Instagram)
अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या लेकीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि हे खास फोटो शेअर करत तिने त्याखाली एक कॅप्शनदेखील लिहिलं आहे. या फोटोखालील कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “ह्यांना आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो आणि बघता बघता या मुली आपल्या उंचीला आल्यासुद्धा.. किती झरझर मोठ्या होतात या लेकी…”
मधुराणीने शेअर केलेल्या या खास फोटोमध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाची आकर्षक साडी नेसली आहे. तर त्यावर साजेसा गुलाबी रंगाचा ब्लाऊजही परिधान केला आहे. तर मधुराणीच्या लेकीनेदेखील छान नक्षीकाम असलेला पंजाबी ड्रेस परिधान केला आहे, तर मधुराणीच्या भाचीनेदेखील पंजाबी ड्रेस परिधान केला असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये मधुराणीसह तिची लेक व भाची या खूपच गोड दिसत आहेत. दरम्यान, मधुराणीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत चांगला प्रतिसाद दिला आहे. “लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, खूपच छान फोटो, सुंदर आणि गोड,” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे.