मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. भाऊ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पण ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. भाऊ यांनी त्यांच्या अतरंगी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. केवळ राज्यातच नाही, तर देश-विदेशातसुद्धा त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. भाऊ कदम त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढत अधूनमधून त्यांच्या कोकणातल्या गावी भेट देत असतात. असाच भाऊंच्या गावाच्या घराची झलक नुकताच एका व्हिडिओमध्ये समोर आली आहे. (Bhau Kadam Kokan Village)
कोकणातील एक युट्युबर राहिद सोलकर याने त्याच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भाऊ कदम यांच्या कोकणातल्या घराची झलक दाखवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सावडाव हे भाऊ कदम यांचं मूळगाव आहे. त्यांचं कोकणातील घर हे तब्बल ५० वर्ष जुने असून त्यांच्या घराशेजारी छोटीशी विहीर आणि नारळाचं झाड देखील आहे. मातीच्या घरापासून हे घर बांधण्यात आलं असून त्यांच्या घराजवळचं परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे. लवकरच ते या गावी मोठं घर बांधणार आहे.
हे देखील वाचा – माय-लेकाचं नातं, स्वातंत्र्यपूर्व काळ अन्…; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून होत आहे कौतुक
या व्हिडिओमध्ये भाऊ कदम यांचे काका त्यांच्या जुन्या घराची झलक दाखवतात. ज्यामध्ये ते म्हणतात, “भाऊ यांच्या या घराला जवळजवळ ५० वर्ष झालं आहे. ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तेव्हा हे घर बांधण्यात आलं आहे.” तसेच ते पुढे भाऊंबद्दल बोलताना म्हणाले, “भाऊ हे दरवर्षी मे महिन्यात गावी येत असतात. तसेच त्यांच्या ‘करून गेलो गाव’ या नाटकाच्या निमित्ताने ते अनेकदा गावी भेटी देत असतात. नुकतंच ते जून महिन्यात त्यांच्या भावासह गावी आले होते, तिथे काही दिवस राहिले. आणि आम्हा नातेवाईकांशी व गावकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या. भाऊंचं व्यक्तिमत्त्व छान आणि मनमिळावू आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांना प्रेमाने भाऊ म्हणून ओळखतात. तसेच तेसुद्धा आवडीने प्रत्येक गावकऱ्यांची विचारपूस करतात.”
हे देखील वाचा – बायकोला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवत अविनाश नारकरांनी शेअर केली प्रेमाची आठवण, म्हणाले, “बघितलं पोरी तुला…”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. तर भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम हिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील शेअर केला आहे. “माझ्या काकांनी हा व्हिडीओ पाठवला. एका युट्युबरने आमच्या गावच्या घराला भेट दिली आणि हा व्हिडीओ बनवला. हे माझ्या गावचं घर आहे. आणि हा व्हिडीओ बघून मी अत्यंत भावनिक झाले. आणि मला अभिमान वाटतो. कधी कोकणात परत जाते, असं वाटतं.”, असं मृण्मयी यामध्ये म्हणाली. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी भाऊ हे त्यांच्या भावासह कोकणातल्या गावी आले होते. ज्याचे फोटोज प्रचंड व्हायरल झाले होते.