सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी (२९ ऑक्टोबर) निधन झालं. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!” असं लिहित मृणाल कुलकर्णी यांनी आईच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. (Shivani Rangole on Veena Deo Death)
अशातच आता मृणाल कुलकर्णी यांची सून म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेनेदेखील वीणा देव यांच्याबद्दलची भावुक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर शिवानीने वीणा देव यांच्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि त्यांच्याबद्दलच्या भावुक आठवणी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये शिवानीने असं म्हटलं आहे की, “त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची. म्हणून प्रवासात मोजे सोबत ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंगसाठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्कानी कधीही फोन करायचे आणि त्या ही आनंदाने मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी मालिका अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या. माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरासारखा आहे असं विराजसला म्हणायच्या. गमतीशीर किस्से सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमक यायची. गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन, मॅसेज करायचे तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा.
आणखी वाचा – अमोलच्या आजारपणाचे नेमके कारण आले समोर, अप्पी-अर्जुनला कळलं सत्य, तिघांच्या आयुष्यात काय बदल होणार?
यापुढे शिवानीने त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे की, “हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमानी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधा मध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या ह्याच हसऱ्या आठवणी सोबत घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि इथून पुढेही येईल”. दरम्यान, या पोस्टखाली अनेकांनी वीणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.