काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाच्या बाबतीत एक बातमी समोर आली होती. स्वतःची बंदूक साफ करताना त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवसानंतर त्याला रुग्णालयातून सोडून देण्यात आले. त्याच्याबद्दल हा प्रकार घडल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी गोविंदा लवकर बरा व्हावा अशी प्रार्थनादेखील केली. आता गोविंदा बरा होत असून त्याबद्दलच्या अपडेट समोरही येत आहेत. अशातच आता गोविंदाचा भाचा कृष्णाने मामा गोविंदासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये असे काय आहे? आणि याची इतकी का चर्चा होत आहे? याबद्दल जाणून घेऊया. (krushna abhishek on govinda)
गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा व कृष्णा यांच्या नात्यामध्ये मतभेद होते. मात्र आरती सिंहच्या लग्नात सगळे कुटुंबीय एकत्र आलेले दिसून आले. आता त्याने एक पोस्ट शेअर केली असून मामा लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. कृष्णाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये एकदा राजा बाबू हे पात्र साकारलं होतं. ही क्लिप त्याने सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहिली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कृष्णाने लिहिले की, “मी खूप हुशार आहे असं लोक म्हणतात. पण माझ्या शरीरात अर्ध रक्त जर गोविंदा मामा सारख्या हुशार माणसाचं असल्याने मी हुशार तर असणारच. खूप प्रेम चीची मामा. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही लवकर बरे व्हा. मला तुमच्याबरोबर नाचायचं आहे”.
कृष्णाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये करिश्मा कपूरदेखील दिसून येत आहे. या पोस्टवर आरती सिंह, सलीम मर्चंट, सुधांशु पांडे, राजिव ठाकूर आशा कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धननेदेखील या पोस्टला पसंती दर्शवली आहे. कृष्णाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो नुकताच ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याची पत्नी काश्मिरा शाहदेखील दिसून आली होती.