बॉलिवूड अभिनेता गोविंदाबरोबर गेल्या मंगळवारी मोठा अपघात झाला. पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. मंगळवारी (१ ऑक्टोबरला) ही घटना घडली. पायाला गोळी लागताच त्याला तातडीने मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करून गोळी काढली, त्यानंतर आता तीन दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोविंदाला डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याची पत्नी सुनिता आहुजा व लेक टीना आहुजा त्याच्याबरोबर होते. गोविंदाच्या पायाला दुखापत झाली आहे, पण तो लवकरच बरा होऊन डान्स करू शकेल, असं सुनिता आहुजाने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. (Govinda Discharge News)
सोशल मीडियावर गोविंदाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेता व्हीलचेअरवर बसलेला पाहायला मिळत आहे. त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी अभिनेत्याबरोबर मुलगी टीना आणि पत्नी सुनीताही दिसल्या. यावेळी गोविंदाने मीडियाशी संवादही साधला. तेव्हा तो असं म्हणाला की, “मी सर्वांचे आभार मानतो. प्रशासन, पोलीस आणि राज्याशी संबंधित आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. प्रत्येक विभागातील लोकांचे आभार. तुमच्यामुळे मी सुरक्षित आहे”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मला तेव्हा वाटलं की हे काय झालं. मी कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. सकाळचे पाच-सहा वाजले होते. तेव्हा ती बंदूक माझ्या हातातून पडली आणि त्यातून गोळी सुटली. त्यानंतर ती थेट माझ्या पायाला लागली. तेव्हा माझ्या पायाला झटका लागल्यासारखं काही तरी झालं. मी बघितलं तर फवारा निघत होता. मला वाटलं यात इतर कुणाला सहभागी करू नये, यासाठी मी डॉ. अग्रवाल यांच्यासह क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो”.
गोविंदा व्हीलचेअरवर हॉस्पिटलमधून बाहेर आला. त्यांची पत्नी सुनीता आणि बाकीचे कुटुंबही तिथे होते. चाहत्यांची गर्दी पाहून गोविंदा भावूक झाला आणि त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी प्रार्थनांचे आभार मानले. गोविंदाला डिस्चार्ज मिळण्यासाठी पत्नी सुनीता ४ ऑक्टोबरला रुग्णालयात पोहोचल्या होत्या. दरम्यान, अभिनेत्याच्या या अपघाताचे वृत्त कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली होती.
गोविंदाची पत्नी आणि मुलगी टीना हॉस्पिटलमध्ये त्याच्याबरोबर उपस्थित होते. राजपाल यादव आणि रवीना टंडनसह अनेक कलाकार अभिनेत्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. कृष्णा अभिषेक, त्याची पत्नी कश्मिरा आणि बहीण आरती हेदेखील गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते.