मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा उर अभिमानाने भरुन आला आहे. कारण छाया कदम यांनी महत्वाची भूमिका साकरलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची यंदाच्या ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्करसाठी निदव झालेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या बातमीमुळे सध्या छाया कदम यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांची ही भूमिकाही नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘लापता लेडीज’ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर छाया कदम यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या व्हॅनिटी व्हॅनसमोर उभ्या आहेत आणि या व्हॅनिटी व्हॅनवर त्यांच्या ‘लापता लेडीज’मधील ‘मंजू माई’ या नावाची पाटी लावलेली पाहायला मिळत आहे. या पाटीकडे छाया कदम या कौतुकाने पाहत पाठमोऱ्या उभ्या आहते. या पोस्टसह “आणि तुमची मंजू माई ‘ऑस्कर’पर्यंत पोहचली” अशी पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
छाया कदम यांनी असं म्हटलं आहे की, “अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की, आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहचावी. पण त्यासाठी त्या कलाकाराच्या वाट्याला तसे पात्र ही यावे लागते आणि मला आनंद आहे की, माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या माध्यमातून ‘मंजू माई’ हे पात्र आले. आज तुम्हा सर्वांच्या प्रेमाने तुमची ‘मंजू माई’ ‘ऑस्कर’पर्यंत पोहचली. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या आणि ‘मंजू माई’बरोबर राहो”.
दरम्यान, छाया कदम यांनी ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’, ‘लापता लेडीज’ व मडगाव एक्सप्रेस’ व ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील. अशीच काहीशी त्यांची ‘मंजू माई’ ही भूमिका आहे