‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. हे पर्व सध्या चर्चेत आलं असून खेळाला रंगत आली आहे. अशातच पहिले दोन आठवडे शांत असलेले पॅडी दादा आता त्यांचा खेळ दाखवत असून प्रत्येक खेळामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. पॅडी दादांच्या या खेळाचं मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा कारकिर्दीवरुन केलेला अपमान पाहून अनेकांनी यावर आक्षेप घेत तिला खडेबोल लगावले. यावेळी पॅडी दादांनी दाखवलेल्या संयमाचं अनेकांनी कौतुकही केलं. (Vishakha Subhedar On Paddy Kamble)
‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठवड्यातील पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरुन ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या खेळामध्ये पॅडी दादांनी चपळता दाखवत अरबाज व वैभवला पळता भुई करुन सोडलं. या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळेने कोणाशीही न भिडता मोठ्या हुशारीने आणि चतुराईने खेळलेला खेळ साऱ्यांच्या पसंतीस पडला. या खेळात पॅडी कांबळेने विरुद्ध टीममधील अरबाज-वैभवची दमछाक केली.
पॅडीचा हा खेळ पाहून त्याची जिवाभावाची मैत्रीण अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने पॅडीसाठी शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. पॅडी दादांचं कौतुक करत विशाखा यांनी लिहिलं आहे की, “काल काय जोरदार खेळ रंगला. तुझं अंदाजे वयवर्षे ५२ असावं. पण बाबो, त्यांना कसलं पळवलं आहेस. मज्जा आली. तू बहारदार खेळला आहेस. पॅडी कांबळे. निक्कीची टकळी सुरु असताना तू जे उत्तर तिला देतोस ना त्यानंतर काय बोलावं ते सुचत नाही. अभी तो खेल शुरु हुआ हैं”.
यानंतर अरबाज व वैभवला नाचवतानाचा एक व्हिडीओही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अरबाजने पॅडी दादांना दोन पायांच्या मध्ये धरलेलं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “हलके में मत लेना. तंगड्या जरी आडव्या घातल्या तरी त्याच तंगड्या कधी तुझ्याच गळ्यात पडतील सांगता येणार नाही. बरं का रे एssss अजगरा”, असं म्हणत अरबाजला टोला लगावला आहे.