‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात कोकण हार्टेड गर्लच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिताच्या येण्याने अनेकांना आनंद झाला आहे. कलाकार मंडळीही अंकिताला सपोर्ट करताना दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. अंकिताने आपल्या दमदार खेळाने आणि युक्तीने सगळ्यांनी मनं जिंकली आहेत. टीम बीला अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता साथ देताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखने अंकिताने आखलेल्या रणनीतीचं भरभरुन कौतुक केलं. (Ankita Prabhu Walawalkar Post)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या या अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिता ही मूळची कोकणातील आहे. कोकणवासी असलेली अंकिता सध्या ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून तिच्या घराला मिस करताना दिसतेय. इतकंच नव्हे तर यंदाच्या गणेशोत्सवालाही अंकिता मिस करताना दिसली. गणेशोत्सवाच्या आठवणीत अंकिता रडलेली दिसली त्यावेळी ‘बिग बॉस’ने तिची समजूत काढली. आता गणेशोत्सव सुरु असताना अंकिता वालावलकरच्या सोशल मीडियावरुन तिच्या बाबांसाठी खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर करत दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. पहिल्या फोटोत अंकिताच्या वडिलांच्या डोक्यावर पाट आणि एका हातात फटाक्यांची पिशवी दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोंमध्ये तिच्या घरचा बाप्पा पाहायला मिळत आहे.
पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “बाबा, आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडालेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत व तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे. लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचे नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही. तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते”.
आणखी वाचा – “हिंसा निंदनीयच आहे…”, निक्कीला कानाखाली मारल्यानंतर मराठी अभिनेत्रीचा खोचक टोला, म्हणाली, “जिंकण्यासाठी…”
“नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार, विसर्जनच्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हतं. पण ‘बिग बॉस’च्या घरी जाण्यापूर्वी खूप आधी मी या सगळ्याची व्यवस्था करुन आले. तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, सातव्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील. काळजी करु नका. मी गेल्यावर्षी बाप्पाबरोबर रात्री गप्पा मारल्या होत्या. जेव्हा सगळे झोपले होते, आता मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी”, असं म्हटलं आहे.