Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन नवीन पाहुणे ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाले होते. या दोन नव्या पाहुण्यांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांवर सोपवली होती. मात्र या टास्कदरम्यान स्पर्धकांना एक अट घालण्यात आली होती की हे दोन्ही पाहुणे म्हणजेच घरात आलेले बेबी यांच्याशी स्पर्धकांना केवळ मराठीतच बोलायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही भाषा इथे वापरु शकत नाही असं असतानाच या टास्क दरम्यान झालेल्या एका गोंधळाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आणि या गोंधळाची सर्वत्र चर्चा उडाली. जेव्हा बाळ टीम बीच्या अंकिता वालावलकरकडे असतं तेव्हा अंकिता बाळाशी मालवणी भाषेत बोलते.
अंकिता ही मूळची कोकणातील आहे आणि मालवणी भाषा हा तिचा पॅटर्न आहे. सोशल मीडियावरही रील व्हिडीओ पोस्ट करत असताना ती मालवणी भाषेतच तयार करुन पोस्ट करते. त्यामुळे कोकणकन्या अशा अंकिता वालावलकरची मालवणी ही खासियत आहेत आणि अंकिताने बाळा बरोबर केलेलं संभाषण हे मालवणी मध्ये असल्याचं टीम ए ला खटकतं. त्यावरुन टीम ए बराच वाद घालताना दिसत आहे. वैभव बाहेर येऊन सदस्यांना अंकिताने मालवणी भाषा वापरली असल्याचे सांगतो. त्यावर निक्की, अरबाज पटेल मालवणी भाषा ही वापरु शकत नाही, असं कुठे लिहिलेलं नाही असेही म्हणताना दिसतात. तर वैभव ही मालवणी भाषा नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे असं म्हणताना दिसत आहे. यावरुन निक्की-अरबाज वैभव यांना बरंच ट्रोल करण्यात येत आहे.
तर अंकिता इथं सांगत असते की, मालवणी भाषा मराठीची उपभाषा आहे, त्यामुळे ही भाषा मी वापरू शकते की नाही इतकंच मी विचारलं होतं. मी ही भाषा वापरली नाहीये यावरही ते काहीच ऐकून घेत नाहीत आणि हुज्जत घालू लागतात. आता प्रेक्षक मंडळींनी हा प्रोमो पाहून निक्की अरबाज वैभव यांची चांगलीच कान उघडणीकेलेली पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली कमेंट करत मालवणी भाषेच्या होणाऱ्या अपमानाबाबत प्रेक्षक मंडळी भडकलेली दिसत आहेत. तर अभिनेत्री साक्षी गांधी हिने देखील कमेंट करत, “हे तर मला आवडलंच नाही. मालवणी नाही बोलायचं म्हणे, का नाही बोलायचं?, अंकिताने खरं तर यावर भाष्य करायला हवं होतं. पण त्या लोकांचं वर्चस्वच इतकंच आहे त्यामुळे ती गप्प बसली. हे कुठवर चालणार”, असं तिने म्हटलं आहे. “अहिरणी, मालवणी, विदर्भाची भाषा ही मराठीची उपभाषा आहे त्यामुळे त्या दुसऱ्या ग्रुपने यांचे पॉइंट्स कट केले आहे तर ते चुकीचे आहे”, “मालवणी भाषा नॉन महाराष्ट्रीयन केव्हापासून झाली. अंकिता जेव्हा विचारत होती तेव्हा ‘बिग बॉस’ने यावर उत्तर देणे आवश्यक होते”, असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

तर काहींनी, “मुळात मालवणी भाषा मूळची कोकणातील आहे आणि कोंकण महाराष्ट्रमध्ये येतो तर ते नॉन महाराष्ट्रीयन कसे काय”, “कालच्या भागात सांगितलं, मालवणी भाषा मराठी भाषा नाही, आणि त्याचे पॉइंट लिहिले गेले, हे कितपत योग्य आहे. वैभव तरी कुठे चांगला मराठी बोलतो, तो पण त्याच्या गावच्या भाषेत बोलतो. हे खूप चुकीचं आहे”, “यांना कोल्हापुरी चालते ती मराठी भाषा मानली जाते मालवणी नाही चालत”, “मालवणी ही मराठी भाषा नाही तर कोणती भाषा आहे”, असं म्हणत ट्रोल केलं आहे.