Munawar Faruqui Apologized : स्टॅन्ड अप कॉमेडियन व ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी हा सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असतो. त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रमात तो उपस्थित प्रेक्षकांना टोमणे मारून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. यातूनही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अशातच तो पुन्हा एकदा वादाचे कारण बनला आहे आणि हे कारण म्हणजे त्याने मराठी माणसाविरुध्द केलेलं वादग्रस्त वक्तव्य. नुकतंच त्याने त्याच्या एका स्टॅन्ड अप कार्यक्रमात कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरले होते. या जोकची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मुनव्वरवर जोरदार टीका झाली. कोकणीव मराठी माणसाचा अपमान केल्यानिमित्त त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही त्याच्यावर कारवाईची मागणी केली. (Munawar Faruqui Apologized)
मुनव्वरने वापर केलेल्या शब्दप्रयोगामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. कोकणी माणसाविषयी उल्लेख करताना मुनव्वरने शिवीचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीदेखील त्याला इशारा दिला होता. हा वाद चिघळल्यानंतर मुनव्वरने माफी मागितली आहे. माफी मागताना मुनव्वरने ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. मुनव्वरने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कोकणी माणसाची जाहीर माफी मागितली आहे. “मी कोकणची टिंगल उडवली आहे. पण तसं नाही. माझा तो हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण देत मुनव्वरने सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.
कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf
— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024
मुनव्वर फारुकीने त्याच्या सोशल मीडिया एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात प्रेक्षकांबरोबर काही संवाद सुरु होता, तो जोकही नव्हता. त्याचवेळी कोकणाचा काहीतरी विषय निघाला. मला माहिती आहे की, तळोज्यात खूप कोकणी लोक राहतात आणि माझे खूपही मित्र तिथे राहतात. लोकांना असं वाटतं की, मी कोकणी लोकांची आणि कोकणाची मस्करी केली. पण माझा तसा कोणाताही हेतू नव्हता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. मी तेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्या लोकांनी एन्जॉय केले होते. कार्यक्रमाला सर्व लोक होते. मराठी, हिंदू व मुस्लिम असे सगळे लोक तिथे होते. पण आता इंटरनेटवर अशाप्रकारच्या गोष्टी आल्यावर मला माहिती पडलं. त्यामुळे मी मनापासून सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र”
दरम्यान, मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’मुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आला होता. परंतु, त्याने लोकांची मने जिंकली आणि ट्रॉफी पटकावण्यात तो यशस्वी ठरला. ‘बिग बॉस १७’ जिंकल्यानंतर मुनव्वर आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत परतला. पण, आता तो पुन्हा वादात अडकला आहे. मुनव्वर याच्या या विनोदाचा मनसेनेही निषेध केला असून, मुनव्वर आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिला आहे.