Prashant Damle On Vijay kadam : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. आज (१० ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराई होते. त्यांना कर्करोग झाल्याचेही काही काळापूर्वी समोर आले होते. उपचार घेत त्यांनी या रोगावर मातदेखील केली मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. आजवर त्यांनी मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच मनोरंजन सृष्टीमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत.
विजय यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार मंडळीनीदेखील त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच आता अभिनेते प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. तसा तो आजारी होता पण इतक्या लवकरच निधन होईल असं वाटत नव्हतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो बोलत होतो. पहिल्यांदाच मला अभिनय शिकण्याची संधी त्याच्याकडेच मिळाली”.
पुढे ते म्हणाले की, “१९८३ साली मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. मी,विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आम्ही सगळे जण लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना बघून शिकत होतो. विजय खूपच भारी होता. त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअॅक्ट करण्याची पद्धत छान होती. तो सहाय्यक कलाकारांना खूप पाठिंबा द्यायचा. पण तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे”.
तसेच त्यांच्या आठवणीबद्दल सांगताना ते म्हणाले की, “आमच्या आठवणी तशा खूप आहेत. माझा पहिला चित्रपट मी त्याच्याबरोबर केला होता. पण नाटकात आपण जसे हावभाव किंवा रिॲक्शन देतो तशा रिॲक्शन चित्रपटांमध्ये द्यायच्या नसतात. याचं त्याने मला प्रात्यक्षिकही करुन दाखवलं होतं आणि तो सर्व माझ्यासमोर बसून सगळं समजावून सांगायचा”. दरम्यान आता मनोरंजन क्षेत्रातून त्यांना सर्व कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांनी आजवर केलेल्या कामाचेही सगळेजण कौतुक करताना दिसत आहेत.