Aadesh Bandekar helped : नाटक, मालिका व काही चिटपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नियती राजवाडे. नियती यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. नियती यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मराठी विनोदी कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. गेल्या दशकभरापासून नियती राजवाडे मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत असल्या तरी त्यांचा या सिनेसृष्टीतला संघर्ष हा अजूनही संपलेला नाही. आजही त्यांना एखादी भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या याच संघर्षमय प्रवासाबद्दल नियती यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. नियती यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या खास कार्यक्रमात हजेरी लावली होती. (Aadesh Bandekar helped Niyati Rajwade)
‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात नियती यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल मनमुराद संवाद साधला. यावेळी त्यांना इंडस्ट्रीतल्या वाईट अनुभवाबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्यांनी एक किस्सा सांगितला. एका निर्मात्याने नियती यांचे काही पैसे अडकवले होते. जे आदेश बांदेकरांच्या मदतीने त्यांना मिळाले. याबद्दल नियती यांनी असं म्हटलं की, “लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन आणि आम्ही पाच ते सहा कलाकार होतो. आम्हा सर्वांचे पैसे थकले होते. मालिका सुरु झाल्याच्या तीन महिन्यांनी ती मालिका बंद पडली. पण ती एक उत्तम मालिका होती, आली असती तर खूप चांगली चालली असती. त्याचे शूटिंग आम्ही तीन-चार महीने आधीपासून सुरु केलं होतं. त्यामुळे त्याचे पैसे खूप झाले होते”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्या मालिकेचा निर्माता हा खूप नावाजलेला होता. मालिका अचानक बंद झाल्यामुळे निर्मिती संस्थेला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मी समजू शकते. पण आम्हाला दिसत आहे की, तुम्ही २०-२५ लाखांची गाडी घेऊन जगात फिरत आहे. मग आम्ही असं म्हणू का की, आमच्या पैशांनी तुम्ही मज्जा मारताय. त्या मालिकेसंदर्भातील ते पैसे मिळवण्यासाठी आम्ही अनेक संघटनांना भेटलो. यादरम्यानचं आम्ही आदेश बांदेकरांना भेटलो”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आदेश सरांचे नाव घ्यायला मला भीती वाटणार नाही, कारण त्यांनी आमचे पैसे मिळवून दिले. आदेश सरांनी आम्हाला त्या निर्मात्याला सवलत वगैरे द्यायची आहे का म्हणून विचारलं. यावर आम्ही त्यांना नाही म्हटलं. कारण आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागत होतो आणि या काळात काही समस्या असती तर त्या निर्मात्याने आम्हाला एकत्र बसवून तसं सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आम्ही काही सवलत वगैरे दिली नाही आणि अश्या पद्धतीने आम्हाला आमचे पैसे मिळाले. पण त्या काळात खूप मनस्ताप झाला”.