मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी जोडी म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. काही वर्षे डेट केल्यानंतर विराजस आणि शिवानी यांनी लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. दोघेही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवानी रंगोळेने आजवर अनेक नाटक व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तर विराजस कुलकर्णी हादेखील अनेक चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोघेही एकमेकांच्या कामाचा आदर करत असून एकमेकांना पाठिंबाही देतात.
विराजस हा उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम दिग्दर्शकही आहे. अशातच त्याचं नवीन नाटक येत आहे. विराजसच्या या नवीन नाटकानिमित्त शिवानीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुव्रत जोशी व सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘वरवरचे वधू-वर’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विराजस कुलकर्णीने केलं आहे. याचनिमित्ताने शिवानी तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
शिवानीने या नवीन नाटकाचा प्रोमो शेअर करत असं म्हटलं आहे की, “लेखक व दिग्दर्शक म्हणून विराजसचे नवीन नाटक शेअर करताना मला खूप अभिमान वाटतो. माझ्या ओळखीच्या सुव्रत व सखी हे प्रतिभावंत कलाकार या नाटकात असल्याचा आनंद आहे. तसेच फुलवा खामकर यांच्या नाटकाशी असलेल्या विशेष सहवासामुळे हे नाटक नक्कीच सुपरहिट होणार आहे! या नाटकाच्या पूर्ण टीमला खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा!” शिवानीच्या या पोस्टवर सुव्रत, सखी, विराजस व फुलवा यांनी कमेंट्स करत तिचे आभार मानले आहेत. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत उत्तम प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, विराजसबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा तो मुलगा. विराजसनं झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. अल्पावधीतच विराजस घराघरात लोकप्रिय झाला. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय लेखक आणि दिग्दर्शकही आहे. प्रायोगिक नाट्य क्षेत्रात विराजस अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.