झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अक्षरा व अधिपती लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली आहे. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता मालिकेतील या सिक्वेन्सचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अधिपती-अक्षरा थायलंडमधील समुद्रकिनारी धावताना पाहायला मिळत आहे. दोघांचा ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय गाण्यावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अधिपती-अक्षराचा खास लुकदेखील पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये नेहमी साडीत दिसणाऱ्या मास्तरीण बाई पांढऱ्या रंगाच्या वन-पीसमध्ये दिसत आहेत. तर अधिपतीनेही पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅंट परिधान केल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “किती छान दिसतात दोघेही”, “नाद खुळा”, “अक्षरा एकदम वेगळीच दिसते”, “हा प्रोमो खूपच आवडला” अशा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडला नसल्याचे म्हटलं आहे. “दोघांना हे अजिबात सूट करत नाहीये”, “बंद करा ही मालिका”, “मालिकेत नवऱ्याच्या शब्दापुढे काहीच चालत नाही. अगदी मिळमिळीत मालिका आहे”, “यांनी खूपच खर्च केला आहे”, “मराठी मालिका अन् कॉपी करणार हिंदी गाण्याला?” अशा कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.