बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी ही सध्या खूप चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलबरोबर अथिया मागील वर्षी ती लग्नबंधनात अडकली. दोघांच्याही लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. अगदी साध्या पद्धतीने अथिया व राहुल यांचे लग्न पार पडले. त्यानंतर अनेकदा अथिया गरोदर असण्याच्या चर्चादेखील अधिक प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र यावर स्वतः सुनीलने भाष्य करुन तो सध्या आजोबा होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अथिया व राहुल हे नुकतेच राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यासाठी हजर असलेले दिसले. मात्र सध्या ते आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. (k.l. rahul and athiya shetty new house)
अथियाने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला हवे तसे यश मिळू शकले नाही. लग्नानंतर ती अभिनयापासून दूर असलेलीही दिसून आली. मात्र के. एल. राहुल त्याच्या खेळामुळे नेहमी चर्चेत असतो. अशातच त्यांच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. दोघांनी आता नवीन घर खरेदी केले आहे. मुंबईमधील अपस्केल पाली हिल परिसरात एक अलिशान घर खरेदी केलं असून त्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. या अलिशान घराचं क्षेत्रफळ 3,350 स्क्वेअर फुट आहे तसेच संधु पॅलेस बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर आहे.
याबद्दलची माहिती IndexTap.com या प्रॉपर्टी कंपनीकडून मिळाली आहे. यानुसार, या बिल्डिंगला बीएमसीकडून पार्शियल ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं आहे. अथिया व राहुलने या घरासाठी तब्बल 1.20 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी व 30,000 रुपये नोंदणी फी भरली आहे. या बिल्डिंगमध्ये चार पार्किंग आहे. या घराची किंमत 20 कोटी रुपये सांगितली जात असून घराची नोंदणी 15 जुलै रोजी झाली आहे.
अथिया व राहुल यांनी ज्या भागात घर घेतलं आहे त्या भागात अनेक कलाकारांची घरं आहेत. दिलीप कुमार, आमिर खान अशा बड्या व्यक्तींची घरं या भागात आहेत. तसेच सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान, जान्हवी कपूर यांचीही घरं या भागात आहेत.