झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करुन घेतलं आहे. मालिकेत अक्षरा व अधिपतीच्या बॉण्डिंगवर चाहते भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता हृषीकेश शेलार याच्या या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. या मालिकेतील अधिपतीच्या संवादाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे.
अशातच आज ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेशचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. अधिपती-अक्षरा म्हणजेच ऋषिकेश व शिवानी हे सोशल मीडियावरचांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही तूफान प्रतिसाद मिळतो. अशातच मास्तरीण बाई म्हणजेच त्याची सहअभिनेत्री शिवानी रांगोळेने एका खास पोस्टद्वारे त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवानीने ऋषिकेशबरोबरचे खास फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, “हृषी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला आयुष्यात तुम्हाला हवे असलेले काहीही आणि सर्वकाही मिळूदेत. तसेच तुझ्या मेहनतीचा, इच्छाशक्तीचा आणि मनाच्या चांगुलपणाचा मला अभिमान आहे. बाकी, चांगलं वागा”. शिवानीने नुकत्याच शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
त्याचबरोबर शिवानीच्या या पोस्टखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे लाडक्या अधिपतीला म्हणजेच ऋषिकेश शेलारला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या दोघांची मालिकेतील केमिस्ट्री ही सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. भुवनेश्वरीने दोघांना घरातून बाहेर काढल्यानंतर हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. यासाठी दोघे वाट्टेल ते काम करत आहेत. पण यादरम्यान, त्यांच्यातील खास बॉण्ड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्यातील या खास केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.