सिनेविश्वात असे अनेक कार्यक्रम ज्या कार्यक्रमांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमांपैकी नाव घ्यायचं झालं तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या दोन्ही विनोदी कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमातील कलाकारही नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असतात. अशातच गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचा व कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या कार्यक्रमाला मंदार चांदवडकर व समीर चौघुले यांनी हजेरी लावली होती. या दोघांबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. (Saleel Kulkarni On Sameer Chaughule)
ही पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बोरिवलीच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ला एक फार चांगला योग जुळून आला होता. योगायोगाने दोन अभिनेते मित्र कार्यक्रम ऐकायला आले. मंदार चांदवडवकर ( ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधले आत्माराम तुकाराम भिडे) आणि समीर चौघुले (महाराष्ट्राची हास्यजत्रा) या दोन्ही कार्यक्रमांचं माझ्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझी मुलं, शुभंकर व अनन्या वय वर्षे ६, ७ असल्यापासून अनेक वर्ष रोज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बघत असत आणि हा खरंच एक असा कार्यक्रम आहे जो आजी. आजोबा आणि नातवंडं यांनी एकत्र बसून बघावा. प्रत्येकाच्या आवडीची व्यक्तिरेखा वेगळी असू शकते. काही तज्ज्ञांना कदाचित असे कार्यक्रम खूपच टिपिकल वगैरे वाटतील पण संपूर्ण कुटुंब आपापले फोन, लॅपटॉप बाजूला ठेवून एकत्र बसतात आणि मनसोक्त हसतात. या क्षणांचं महत्त्व आत्ताच्या काळात खूप मोठं आहे”.
“‘हास्यजत्रा’चा अमुक एपिसोड पाहिलास का?, ही चर्चा घरात, आमच्या कलाकार मित्रांमध्ये सतत चालू असते. “गवताचं पातं .. बया ..” हे सतत गुणगुणलं जातं. हे मी नम्रताला सांगू शकलो हे माझं भाग्य. समीर, नम्रता, प्रसाद ,अरुण कदम , सावत्या ,शिवाली , पॅडी , रसिका, वनिता विराज ,निषीम , प्रियदर्शनी, ईशा , दत्तू , बने , चेतना , रसिका , मोरे , श्याम , हेमंत आणि ओंकार, विशाखा, गौरव हे आपले नातेवाईकच आहेत आणि त्या वृत्ती आपल्यातल्याच आहेत. कधीकधी आरसा दाखवणाऱ्या आहेत. कधी अतर्क्य वाटणाऱ्या आहेत, असं संपूर्ण मराठी जगातला वाटतं हे श्रेय सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांचं आहे. आणि प्राजक्ता , प्रसाद-सईचं सुद्धा. हसरी माणसं दिसणं दुर्मिळ होत असतांना, यांचे चेहरे बघून किती छान वाटतं. हे सगळं जुळवून आणणाऱ्या अमित फाळकेला सलाम. लॉकडाऊनच्या काळापासून त्यांनी अनेकांची घरं आणि मनं हसरी ठेवली आहेत”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “परवाच्या कार्यक्रमाला हे दोघेही योगायोगाने प्रेक्षकांत दिसले आणि मला त्यांचे आणि या दोन्ही कार्यक्रमांचे जाहीर आभार मानता आले यांचं खूप समाधान आहे. आत्ताच्या वातावरणात हसणारी माणसं आणि हसवणारी माणसं यांची गरज खूप मोठी आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे जाहीर आभार”, असं म्हणत त्यांनी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.