‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमुळे सईला खूपच लोकप्रियता मिळली. या शोनंतर अभिनेत्री कोणत्या मालिका किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लहान मुलीबद्दलही अनेक पोस्ट शेअर करत असते.
सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीचं बारस केलं. पण लेकीचं नाव सईने जाहीर केलं नव्हतं. १७ जानेवारी २०२४ला अभिनेत्रीने मुलीचं नाव जाहीर करत त्या नावामागचा अर्थदेखील सांगितला. सईच्या मुलीचं नाव ताशी असं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता. काही दिवसांपूर्वी सई लेकीसह परदेशवारीळा गेली. याबद्दल तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.

आणखी वाचा – “तरीही संसार करेन मनापासून आणि…”, लीलाचा एजेसाठी हटके उखाणा, ऐकून कुटुंबियांनाही झाल भलताच आनंद
अशातच आता सईने तिच्या लेकीला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सईने “माझ्या मुलीला सहा महिने पूर्ण झाले आहेत” असं सांगत तिने तिच्या मुलीला उद्देशून एक संदेश लिहिला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आई तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला तुझे पालनपोषण करण्याचा विशेषाधिकार दिल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला देवदूत आहेस. मला तुझी आई म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस. तुझ्या पाठीशी देवाचे आशीर्वाद कायम राहो”.
गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी सईने तिच्या लेकीला जन्म दिला. “आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” असं म्हणत तिने तिच्या लेकीच्या जन्माची बातमी दिली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.