‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. शिवानी या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षरा या भूमिकेमुळे शिवानीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यात बहरणार प्रेम पाहणं रंजक ठरत आहे. सोशल मीडियावरही शिवानी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत असते. शिवानी मालिकेबरोबरच खऱ्या आयुष्यामुळेही चर्चेत असते. (Shivani Rangole Home)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना ओळखले जाते. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या शाही लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. लग्नानंतर शिवानी कुलकर्णी यांच्या घरात रमलेली दिसली. शिवानीचा नवरा विराजस व सासू मृणाल कुलकर्णी या सिनेविश्वात कार्यरत आहेत. कुलकर्णी यांच्या घरी आल्यानंतर शिवानीचे बरेच लाड होताना पाहायला मिळतात. नेहमीच ती नवऱ्याबरोबर व सासूबरोबरचे अनेक फोटो शेअर करताना दिसते.
कुलकर्णी यांच्या घरी आल्यानंतर त्यांची सून म्हणजेच शिवानीने त्यांच्या मुंबईतील घराची सजावट केली आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात शिवानीच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळाली. मृणाल कुलकर्णी यांच्या घराची सजावट त्यांनी स्वतः व त्यांच्या सूनेने अर्थात शिवानीने केली आहे. शिवानीने तिचं हे सासरचं घर उत्तमरीत्या सजवलं आहे. नितळ पांढऱ्या रंगाच्या भिंती त्याला साजेसं फर्निचर, खुप सुंदर अशी वस्तूंची मांडणी या घरात पाहायला मिळत आहे. सगळ्या गुणांनी साजेसं असं घर तिने सजवलं आहे. याशिवाय शिवानीच्या नवऱ्याने जमवलेल्या बाहुल्या, खेळणी तिने जपून ठेवली आहेत. शिवानीच मॉड्युलर किचनही खूप आकर्षक आहे.
शिवानीच्या या घरात अजून एक गोष्ट सगळ्यांना आकर्षित करेल ती म्हणजे पुस्तकं. सासरे वकिल, नवरा व सासू कलाकार असल्यामुळे सगळ्यांसाठीच पुस्तक म्हणजे एक प्रकारे खजिनाच आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पुस्तकांसाठी विशेष जागा केली आहे. इतकंच नव्हे तर पुस्तक वाचण्यासाठी त्या खोलीत बसण्याची सोयही केली आहे.